नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
‘हम दोनो’ हा १९६१ सालचा सिनेमा. विजय आनंद यांचे लेखन आणि देव आनंद व साधनाच्या प्रमुख भूमिका असलेली ‘नवकेतन फिल्म्स’ची निर्मिती. ‘हम दोनो’ ही देव आनंदचा डबल रोल असलेली कथा! यात मुग्ध सौन्दर्यवती म्हणून प्रसिद्ध असलेल्या साधनासोबत साधीसरळ नंदाही होती.
सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट तर झालाच शिवाय साहिरने लिहिलेली आणि जयदेव यांचे संगीत असलेली सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली! त्यातील एक गाणे ज्यांनी स्वतःशीच का होईना, कधी गायले नाही, अशी एकही प्रेमी जोडी त्यावेळच्या भारतात नसेल! कारण साहीर या अत्यंत कल्पक कवीने शब्दच असे निवडले होते की, प्रत्येक प्रेमिकाने या गाण्यातील भावना १०० वेळा अनुभवलेली होती! महंमद रफीच्या, तुपाची धार सांडत राहावी अशा नितळ आवाजात आणि आशा भोसलेच्या खोडकर मूडमधील, लाडीक स्वरातल्या त्या अजरामर गाण्याचे शब्द होते –
अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं
मुळात त्याकाळी प्रेमिकांच्या भेटी होणेच अतिदुष्कर! त्यात आल्याआल्याच तिचे जाण्याची घाई करणारे निवेदन! बिचारा अगतिक प्रियकर पहिल्या ओळीपासूनच अनुनयाच्या पवित्र्यात जाणार नाही तर काय करेल? –
अभी-अभी तो आई हो, बहार बनके छाई हो, हवा ज़रा महक तो ले, नजर ज़रा बहक तो ले,
ये शाम ढल तो ले ज़रा, ये दिल संभल तो ले ज़रा
अरे बाबा, तू आताच तर आलीस ना? आणि बघ तू येताच सगळ्या आसमंतात कसा वसंत फुलू लागलाय, प्रिये! हवेतला धुंद करणारा हा सुगंध मला अनुभवू तर दे ना! माझ्या नजरेत तुझ्या दर्शनाने आलेली बेहोशी वाढू तर दे! ही बेधुंद संध्याकाळ अधिक गहिरी होऊ दे की गं राणी! अनावर झालेले माझे चित्त मला थोडे सावरू तर दे. प्रिये तू अशा निरोपाच्या, परत जाण्याच्या गोष्टी थोड्या वेळाने कर की! असे जे साहिरने लिहून ठेवले ते लाखो प्रियकरांच्याच मनातले शब्द होते!
तो म्हणतो, मला तुझ्याशिवाय कशातच आनंद वाटत नाही. तुझ्या अनुपस्थितीतले जगणे मला जगणेच वाटत नाही. प्रिये, तुझी भेट हेच तर माझ्या जीवनातले एकमेव सुख आहे! आणि तू तर आल्याआल्याच जायच्या गोष्टी करू लागलीस. मला क्षणभर तरी जगू देशील की नाही? आजच्या या सुंदर संध्याकाळी आपल्या भेटीच्या मद्याचे चार थेंब मला चाखू तर दे ना! मी अजून तर काही बोललोच नाहीये? आणि तू तरी अजून तुझे ओठ उघडले आहेस? मला तर तुला काय काय सांगायचे आहे, काय काय विचारायचे आहे. मला छळणारे अनेक प्रश्न विचारायचे आहेत. त्यांना तू दिलेली उत्तरे ऐकायची आहेत. तू बोलताना तुझ्या चेहऱ्यावर काय भाव उमटतात ते पाहायचे आहे.
ती सारखीसारखी तुझ्या डोळ्यांसमोर येणारी केसांची बट निरखायची आहे!
मैं थोड़ी देर जी तो लूँ,
नशेके घूँट पी तो लूँ…
अभी तो कुछ कहा नहीं,
अभी तो कुछ सुना नहीं…
तिचे मात्र वेगळेच सुरू आहे आणि ते स्वाभाविकही आहे. प्रियकर जरी तिच्या सहवासात जगाचे भान विसरला असला तरी, तिला ते ठेवणे भागच आहे. अजून ही प्रेमकथा हे दोघातले गुपितच आहे. ती सफल कुठे झालीय? कोणत्याही प्रेमसंबंधांना जोवर विवाहाच्या पवित्र सूत्रांत बांधले जात नाही तोवर भेटीही वर्ज्य असण्याचा तो सुसंस्कारित काळ! त्यामुळे तिने त्याला सावध करणे गरजेचेच आहे! ही भेट आता संपवलीच पाहिजे म्हणून ती म्हणते –
सितारे झिलमिला उठे,
चिराग़ जगमगा उठे
बस अब न मुझ को टोकना,
न बढ़के राह रोकना…
कारण आता जर मी परतले नाही, तर अनर्थच ओढवेल. मला घरचेच घरात घेणार नाहीत –
अगर मैं रुक गई अभी,
तो जा न पाऊँगी कभी
तुला कसलीच फिकीर नाही. तू आपला हेच म्हणत बसशील की, ‘थांब, अजून थांब. अजून माझ्या मनाचे समाधान झालेलेच नाही.
यही कहोगे तुम सदा
कि दिल अभी नहीं भरा
जो ख़त्म हो किसी जगह,
ये ऐसा सिलसिला नहीं…
प्रियकर बिचारा अजूनही निरोपाला तयार झालेला नाही. त्याची तहान भागलेलीच नाही… म्हणून तो तक्रारीच्या सुरात म्हणतो –
अधुरी आस छोड़के,
अधुरी प्यास छोड़के
जो रोज़ यूँ ही जाओगी,
तो किस तरह निभाओगी?
आयुष्यात अनेक परीक्षेचे क्षण अजून यायचे आहेत. त्यावेळी तू अशीच मधेच निघून जाणार का?
कि ज़िन्दगी की राह में,
जवाँ दिलों की चाह में
कई मक़ाम आएँगे,
जो हम को आजमाएँगे…
तो तक्रार करून तर बसतो, पण लगेच त्याला काळजी वाटते, ‘अरे देवा, ही अशा थेट प्रश्नाने रागावली आणि कायमची निघून गेली तर?’ म्हणून तो लगेच सावरून घेत म्हणतो –
बुरा न मानो बात का,
ये प्यार है गिला नहीं…
ही काही मी तुझी तक्रार करत नाहीये गं, हे तर तुला कधीच निरोप न देऊ इच्छिणारे माझे अतूट प्रेम आहे…
साहिरने आशाच्या तोंडी दिलेले यानंतरचे शब्द तर एक अंतिम सत्यच सांगून जातात. प्रेमात कसली तृप्ती? कसला निरोप? प्रेमातली व्यक्ती तर प्रत्येक भेटीच्या शेवटी हेच म्हणणार ना –
के दिल अभी भरा नहीं!
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…