प्रितेश पाटील
डहाणू : डहाणूमध्ये एसटी संपाचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांची मुजोरी सुरू झाली आहे. वाहतुकीसाठी अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे.
डहाणूत एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा चांगलाच फटका डहाणूतील नागरिकांना विशेषतः आदिवासी जनतेला बसत आहे. राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसला आहे.
सर्वाधिक आदिवासी जनतेचे एसटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन असल्याने त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानीपणे भाडे आकारणी करून घेत आहेत. अनेकदा रिक्षा जंगल भागात जाण्यासाठी गुरा-ढोरांसारखे प्रवासी कोंबून त्यांच्याकडून मनमानीपणे दुप्पट किंवा तिप्पट, चौपट भाडे घेतले जात आहे. तथापि, जास्तीचे भाडे देऊनही अत्यंत कोंदट वातावरणातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
जीपच्या पायरीवर किंवा रिक्षाच्या खिडकीवर तसेच रिक्षा, टमटम, जीप चालकाजवळ चालकाव्यतिरिक्त चार-चार, पाच-पाच प्रवासी भरून प्रवास करतात. त्यामुळे नेहमीच अपघात घडत असतात. त्यातच जीप आणि टमटम चालकाची अरेरावी पाचवीलाच पुजली आहे.
हे सर्व जीप आणि टमटम रिक्षावाल्यांचे प्रकार समोर होत असतानाही, कोणी त्यांना हटकायला तयार नाही. एसटीचा संप सुरू असल्याने कामधंद्यानिमित्त बाहेर पडणारा प्रवासी मिळेल त्या वाहनांनी जाण्याचा प्रयत्न करत असतो.
अशी सुरू आहे लूट…
डहाणू शहरात डहाणू एसटी आगार ते डहाणू रोड स्टेशन अर्धा किलोमीटर अंतरासाठी २० रुपये, डहाणू पंचायत समिती २५ रुपये, डहाणू कोर्ट २० रुपये असे मनमानी भाडे खासगी वाहतुकदारांकडून सध्या आकारले जात आहे. लहान तीन आसनी रिक्षात सहा-सात प्रवासी, टमटममध्ये अकरा-बारा प्रवासी, तर जीपमध्ये सतरा-अठरा प्रवासी भरले जातात. तथापि, या साऱ्या गैरप्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.