वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील गौरापूर येथील शेतकरी निलम म्हात्रे यांच्या खळ्यावरील रचून ठेवलेल्या भाताच्या भाऱ्यांना रात्रीच्या सुमारास अज्ञाताने आग लावल्याने सर्व भारे जाळून राख झाले आहेत.
शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास म्हात्रे यांच्या खळ्यावरील भाताच्या भाऱ्यांना आग लागली असल्याची माहिती गौरापूर येथील नागरिक प्रमोद हरड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी इतर गावकऱ्यांना घेऊन शेताकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र रचलेले सुमारे एक हजार पन्नास भारे आगीत भस्म झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शेजारचे तीनशे, चारशे भारे थोड्या अंतरावर असल्याने ते बचावले आहेत.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला असला तरी म्हात्रे यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी खूप आटापिटा करून काही भात वाचवले होते; परंतु कुणी अज्ञात इसमाने या भाऱ्यांना चारही बाजूने आग लावल्याने यातील सर्व भाताचे भारे जळून गेले गेले. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती हरड यांनी दिली.