Friday, June 13, 2025

आझाद मैदानात एसटी कर्मचारी उद्या आणखी आक्रमक होणार

आझाद मैदानात एसटी कर्मचारी उद्या आणखी आक्रमक होणार

पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आंदोलकांनी बाहेर पडू नये यासाठी तटबंदी




मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले असून संपूर्ण आझाद मैदान एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराने तुडूंब भरले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील ११ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.


आज भाजप नेते किरीट सोमय्या आझाद मैदानात उपस्थित आहेत. एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचे पडळकरांनी सांगितले होते. पडळकरांच्या या घोषणेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले. पोलीस प्रशासनाने आझाद मैदानात पोलिसांची संख्या वाढवली. आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


कामगारांच्या आत्महत्यांवर सरकारचे भाष्य नाही, हा कॉमन मिनिममचा भाग आहे? : गोपीचंद पडळकर


एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपू नये अशी आमची भूमिका नाही. राज्य सरकारला हा विषय संपवायचा नाही. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करण्याचे ठरलंय असे सांगितले जाते. राज्य सरकारमधील तीन पक्षांचा एसटीच्या जागांवर डोळा आहे का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार एसटी कामगारांच्या आत्महत्यांवर चर्चा करत नाही. सरकारच्या तिन्ही पक्षांचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केला आहे.

Comments
Add Comment