मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ४ ऑक्टोबरपासून ८ वी ते १०वीच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही शाळा सुरू केल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत पालिकेने केले. मात्र आता ८ वी ते १० वीच्या पालिका शाळांतील ३४ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये ८वी ते १०वीच्या शाळांत ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र पालकांच्या मनात कोरोनाची भीती अजूनही असल्यामुळे ७१ हजार विद्यार्थ्यांपैकी २४ हजार २८९ विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने मुंबईतील ८ ते १०वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, मुंबईत ४ ऑक्टोबरपासून ८वी ते १०वीच्या शाळा सुरू झाल्या. पालिका शाळांत ८ ते १०वीचे ७१ हजार ९२३ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याआधी पालकांनी संमतीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले. मात्र यापैकी २४ हजार २८९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र न देता मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या मनात अजूनही कोरोनाची धास्ती कायम असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.