मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने १०० कोटींचा भ्रष्टाचार केला असून या निविदा तातडीने रद्द करून यातील घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी या प्रसंगी उपस्थित होते.
कोटेचा यांनी सांगितले की, महापालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील, असे कळविले होते. १७ नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसांत संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल, याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले, असे कोटेचा म्हणाले.