Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघार घेणार नाही...

चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघार घेणार नाही…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला. पाकिस्तानला २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय अंतिम असेल, असे भारताने स्पष्ट केले असताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मात्र भारत माघार घेणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे.

पाकिस्तानने १९९६मध्ये भारत व श्रीलंका यांच्यासह संयुक्तपणे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाक भूषविणार आहे, पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरक्षेच्या कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तान दौऱ्यामधून माघार घेतली आहे. त्यावेळी (२०२५मध्ये) सुरक्षेचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार निर्णय घेऊ, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तसेच भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही, हे ठरवण्यासाठी गृह मंत्रालयाची भूमिका फार महत्त्वाची असेल. गृह मंत्रालयालाही या निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं जाणार असून विचारविनिमय केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे ठाकूर म्हणाले.

त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानची सुरक्षाव्यवस्था ही इंग्लिश प्रीमिअर लीग व फॉर्म्युला-१ पेक्षाही सरस असेल, असे आमच्या सुरक्षातज्ज्ञांनी मला सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेणे सोपी गोष्ट नाही. जेव्हा स्पर्धेच्या आयोजनाचा मान दिला गेला, तेव्हा दोन्ही देशांतील बोर्डांचा विचार केलाच असेल. माझ्या मते, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघार घेणार नाही, असे ते म्हणाले. भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका होणे सध्या तरी शक्य नाही; परंतु तिरंगी मालिकेत दोन्ही संघांना खेळताना पाहण्याची अपेक्षा करतो, असेही रमीझ राजा यांनी सांिगतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -