Tuesday, April 29, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीयरत्नागिरी

शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकासाचा मार्ग सुकर नाही

शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकासाचा मार्ग सुकर नाही

ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच…

राजापूर (प्रतिनिधी) : ‘कायमच भावनिक राजकारण करून आपला राजकीय स्वार्थ साधणाऱ्या शिवसेनेने येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले नाही. रस्ते, वीज, पाणी या प्राथमिक सुविधाही त्यांनी पुरविल्या नाहीत. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीपासून सर्वांना वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला आडवं केल्याशिवाय राजापूर तालुक्याच्या विकासाचा मार्ग सुकर होणार नाही’, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी जानशी येथे केले.

‘भावनिक राजकारण करून आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन मते मागून सत्तेत बसलेल्या ठाकरे कुटुंबातील एक तरी सदस्य बुधवारी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहण्यासाठी गेला काय?’, असा खडा सवाल उपस्थित करून ‘तुम्ही यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका’, असे आवाहन यावेळी राणे यांनी केले. राजापूर तालुका भाजपच्या वतीने अणसुरे पंचायत समिती गणातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा जानशी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशालेतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निलेश राणे बोलत होते.

शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर राणे यांनी सडकून टीका केली. ‘शरद पवारांच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे कुठेही दिसत नाहीत. त्यांचा मुलगा लंडनमध्ये मजा करतोय. बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन होता. हजारो शिवसैनिक व बाळासाहेबांना मानणारे अनेकजण शिवाजी पार्कवर आले व बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. पण एक तरी ठाकरे या दिवशी तेथे आला काय?’, असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. ‘मुख्यमंत्री आजारी आहेत, पण मातोश्रीत दुसरे कोणी नाही काय? केवळ राजकारणासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे बाकी काही नाही’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीतील मंत्री तर राज्याच्या विकासापेक्षा आपापल्या विकासात आणि अन्य विषयांत व्यस्त आहेत. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांना राज्याच्या विकासापेक्षा शाहरूख खानच्या मुलाचीच जास्त काळजी आहे, तर धनंजय मुंढेंना शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत. यूपीवरून डान्सर आणून तिचा डान्स पाहण्यात व मजा करण्यात त्यांना रस आहे. या धनंजय मुंढेंचे दर सहा महिन्यांनी नवीन कुटुंब पुढे येते, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘राजापूर मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांनी केले. या खासदाराकडून कधीच विकासाची अपेक्षा ठेऊ नका तो ते करू शकत नाही. तर तीन वेळा लोकांनी निवडून दिले तरीही स्थानिक आमदार काहीच करू शकलेला नाही’ अशी टीका राणे यांनी केला.

Comments
Add Comment