बाबासाहेबांना श्रद्धांजली

Share

शब्दांच्या पलीकडचं दु:ख : नरेंद्र मोदी

बाबासाहेबांच्या निधनाची बातमी हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे. त्यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांची अन्य कामेही स्मरणात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पुरंदरेंच्या विपुल कार्यामुळे आठवणी नेहमी जिवंत राहतील, असे मोदी पुढे म्हणाले.

एका युगाचा अंत : अमित शहा

बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी मराठीमधून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली. त्यांची ऊर्जा व विचार प्रेरणादायी होते, असे ते म्हणाले.

प्रत्येक श्वासात शिवरायांचा ध्यास : कोश्यारी

लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यामुळे अतिशय दुःख झाल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते, असे कोश्यारी म्हणाले.

महाराष्ट्राची मोठी हानी : नारायण राणे

इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दांत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुरंदरे यांना आदरांजली वाहिली आहे.

शतायुषी शिव ऋषीला मुकलो : मोहन भागवत

बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली, असे भागवत म्हणाले.

‘बाबासाहेबांचे जाणे अत्यंत वेदनादायी’

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच!

नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील, ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता. अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेब यांना श्रद्धांजली वाहिली.

‘बाबासाहेबांचे योगदान विसरता येणार नाही’

आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला अत्यंत साध्या भाषेत मांडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी व्याख्यानं घेतली आणि या विषयासंदर्भातली आस्था नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याप्रति व्यक्त केली. इतिहासाच्या क्षेत्रात योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यात एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही, पण ते दीर्घायुषी होते. वयाची शंभरी ही यशस्वीपणे आणि सतत लोकांशी सुसंवाद ठेवत पार पाडली. त्यांना लोकांच्या सदिच्छा मिळाल्या, असं मला वाटतं. ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचं दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देसुद्धा होते. पण त्यासंबंधीचं भाष्य करण्यासाठी मी जाणकार नाही. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान विसरता येणार नाही, असे शरद पवार पुढे म्हणाले.

‘शिवचिंतनात रमलेला शिवआराधक’

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवरायांच्या चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहोचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरे वाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबाचरणी प्रार्थना, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘एक अध्याय पडद्याआड’

ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

‘शिवछत्रपतींचा सेवक त्यांची सेवा करण्यासाठी निघाला’

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच; परंतु ते मला पितृतुल्यही होते. त्यांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं; परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन मिळाले. बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची, असे सांगत शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली.

‘शिवशाहीर आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही’

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक बाबासाहेब पुरंदरे हे आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यांपुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे १००व्या वर्षांत पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही, असे फडणवीस म्हणाले.

‘शिवसृष्टी पूर्ण होण्यासाठी इच्छा पूर्ण व्हावी’

बाबासाहेबांचे प्रयत्न आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातल्या शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली. राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसंच जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

39 minutes ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

2 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

2 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

3 hours ago