मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद शुक्रवारी मुंबईसह महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळाले. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी यांसह अनेक शहरांत मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
त्रिपुरात काही िठकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त असून त्याचा निषेध करण्यासाठी मुस्लीम संघटनांकडून अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांत हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी अनेक दुकानांची तोडफोड केली असून पोलिसांनाही काही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनांनंतर अमरावतीत उद्या ‘बंद’ची हाक देण्यात आली आहे.
भिवंडीतही मुस्लीम समाजानं बंद पुकारला आहे. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. अमरावती शहरात दुकाने बंद ठेवत त्रिपुरातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चेकरी घरी परतत असताना काही जणांनी जयस्तंभ चौकात दुकानांवर दगडफेक केली आणि एका वाहनाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंगोलीत बंद
त्रिपुरा येथील हिंसाचाराचा हिंगोलीत दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. त्रिपुरातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मालेगावात दगडफेक
मालेगावात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. या निषेध मोर्चात जवळपास १० हजार लोक सहभागी झाले होते. निषेध मोर्चावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याने या मोर्चाला गालबोट लागले आहे, त्यामुळे जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
नांदेडमध्येही पडसाद
नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले. दुपारच्या वेळी शिवाजीनगर येथील दुकानांची नासधूस करत व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नाका या भागात दगडफेक करण्यात आली. रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे नांदेड शहरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.