साओ पावलो (वृत्तसंस्था) : पात्रता फेरीत कोलंबियावर १-० अशी मात करताना ब्राझीलने कतारमध्ये होणाऱ्या २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी पात्रता सिद्ध केली आहे. विश्वचषक फुटबॉलसाठी पात्र ठरलेला ब्राझील हा पहिला दक्षिण अमेरिकन संघ आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात लुकास पॅक्वेटाने ७२व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल ठरला. त्याने मारलेला अचूक फटका कोलंबियाचा गोलकीपर डेव्हिड ऑस्पिनाला अडवता आला नाही. हा ब्राझीलचा सलग ११वा विजय आहे. कोलंबियाविरुद्धच्या विजयासह ब्राझीलने १० टीमचा समावेश असलेल्या दक्षिण अमेरिकन ग्रुपमधून १२ सामन्यांत ३४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या खात्यात २५ गुण आहे. या गटातील अव्वल चार संघ २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.