Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत शुक्रवारी वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला असून न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली. ईडीने अनिल देशमुखांची कोठडी वाढवून मागितली होती. तर, अनिल देशमुखांच्या वतीने कोठडीला विरोध करत युक्तिवाद केला. मात्र, आम्हाला केवळ त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे किमान दोन दिवस ईडी कोठडी वाढवावी, असे म्हणणे ईडीकडून मांडण्यात आले.

देशमुख ईडीसमोर बाजू मांडत असताना त्यांनी ‘मी ईडीची २०० हून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत,’ अशी माहिती दिली. तसेच, ‘मला १० दिवस ईडी कोठडीत ठेवण्यात आले. अधिकाऱ्यांनी भरपूर प्रश्न विचारले. जवळपास ८ ते दहा तास चौकशी झाली, असे देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी तुमची छळवणूक केली का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला असता देशमुख यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

‘सचिन वाझेची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडी म्हणत आहे. मात्र, ईडीने वाझेला या प्रकरणात अद्याप एकदाही अटक करून कोठडी मिळवलेली नाही. देशमुख यांच्या पीए आणि सचिवांना अटक केली. आता खासगी व्यक्तींची चौकशी करायची आहे, देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीसमोर बसवून देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे ईडीने सांगितले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायधीशांनी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे.

ऋषिकेश यांनाही दिलासा नाहीच

अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही शुक्रवारी दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते. मात्र, अद्याप ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, अनिल देशमुख यांना देखील १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -