वाडा (वार्ताहर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट कमी करावा, यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल – डिझेलवरील अबकारी करात कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करावी, या मागणीसाठी भाजपने पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील अबकारी कर पाच रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील अबकारी कर दहा रुपये प्रति लिटरने कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे. अशा वेळी राज्य सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करावी, अशी भाजपची मागणी आहे.
‘आघाडी सरकार हाय-हाय’, ‘या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय’, अशा स्वरूपाच्या जोरदार घोषणाबाजी करीत वाडा तहसीलदार यांना भाजपच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. भाजपतर्फे वाडा तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारनेही करकपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, अशी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे, असे या निवेदनात भाजपने म्हंटले आहे. तसेच, भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली, पण महाराष्ट्राने दिलेली नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, डाॅ. हेमंत सवरा, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, जेष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस मेघना पाटील, जिल्हा चिटणीस अश्विनी शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अर्चना भोईर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, गटनेते मनीष देहेरकर, युवामोर्चा सरचिटणीस कुणाल साळवी, तालुका सरचिटणीस रोहन पाटील, सरचिटणीस राजेश रिकामे, अरुण गौंड, राजू दळवी, नगरसेवक अरुण खुलात, प्रसाद सोनटक्के, विजय पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसई तहसीलदार कार्यालयावर भाजपचा मोर्चा
पालघर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी करत वसई भाजपने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. वसई-विरार जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदाराना देण्यात आलेल्या निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
देशातील २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल-डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकार विरोधात विक्रमगडमध्ये निदर्शने
विक्रमगड (वार्ताहर) : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होऊ शकले नसल्याने राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात विक्रमगड तालुका भाजपच्या वतीने विक्रमगड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने अबकारी करात कपात केल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) घसघशीत कपात केली आहे; परंतु राज्यातील ठाकरे सरकारतर्फे असा कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातमध्ये फारशी कपात झालेली नाही.
राज्य शासनानेही मूल्यवर्धित करात कमी करावी, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलच्या दरावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. पण आता हे दर कमी करण्याचा निर्णय घेणे शक्य असतानाही राज्य शासन तो घेत नसल्याने भाजपने आक्रमक होत, राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विक्रमगड तालुका भाजपच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष जयप्रकाश आळशी, सुशील औसरकर, महेश आळशी, सचिन पुण्यार्थी, परेश रोडगे, वैभव पडवळे, अस्लम शेख, शैलेश प्रजापती, लक्षुमण मोरघा, संतोष भोई व विक्रमगड तालुक्यातील इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
जव्हार तहसीलदारांना भाजपचे निवेदन
जव्हार (वार्ताहर) : केंद्र सरकारने करकपात केल्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल सहा रुपयांनी तर, डिझेल बारा रुपयांनी स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. यासंदर्भात जव्हारच्या तहसीलदारांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. अशा प्रकारे राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलच्या दरात सवलत द्यावी, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सुरेखा थेतले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, युवा मोर्चा अध्यक्ष चेतन पारेख, उमेश नायकर, सुधाकर गावित तसेच इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डहाणूत निषेध आंदोलन
डहाणू (वार्ताहर) : केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलवरील कर कमी केला आहे. पण राज्यातील बिघाडी सरकारने कर कमी न करता जनतेला लुटण्याचे काम सुरूच ठेवले आहे, असा आरोप करत भाजप डहाणू शहर मंडळतर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेल दरवाढ बिघाडी सरकारने कमी न केल्यासंदर्भात भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नगराध्यक्ष भरतभाई राजपूत व डहाणू शहर मंडळ अध्यक्ष भरतभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रोहिग्टन झाइवाला, नगरसेवक जगदीश राजपूत, रमेश काकड, भास्कर जीटीथोर, डहाणू शहर सरचिटणीस पिनल शाह, राजेश ठाकूर, युवा अध्यक्ष दक्षेश पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो; त्याखेरीज पेट्रोलवर प्रतिलिटर ९ रुपये सेसही आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. त्यामुळे सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये, तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नसल्याने पेट्रोलवरील प्रति लिटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. – बाबाजी कठोले, ज्येष्ठ नेते, भाजप