नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आता विभागाअंतर्गत चौकशी होणार आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. अमली पदार्थांसंबंधी क्रूझ पार्टीवरील छाप्या प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आता या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एएनआयने हे वृत्त दिले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार असून दिल्लीतील तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्लीतील तीन सदस्यांचे हे पथक उद्या मंगळवारी मुंबईत दाखल होणार आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि २ निरीक्षक स्तरावरील अधिकारी यांचा या पथकात समावेश आहे.
मुंबईच्या क्रूझवर अमली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह उद्योगपतींचीही मुले या प्रकरणात अडकली आहेत. या प्रकरणी किरण गोसावी याच्यामार्फत २५ कोटींची डील झाल्याचा आरोप या प्रकरणातील एक पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण हायप्रोफाइल साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
समीर वानखेडे दिल्लीला रवाना, अटक टाळण्यासाठी मुंबईतून होणार बदली?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आल्याचे दिसते. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज संध्याकाळी बैठक झाली. आता या प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. समीर वानखेडेंच्या खात्यांतर्गत चौकशीसाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक उद्या मुंबईत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे, समीर वानखेडे हे आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
समीर वानखेडेंचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
फरार आरोपी किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला आहे. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असतानाच प्रभाकर साईल याचं कथित प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. त्यातून त्यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोर्टाबाहेर होत असलेले आरोप, उघड केली जात असलेली पंच, साक्षीदारांची नावं यास वानखेडे यांनी हरकत घेतली आहे.
वानखेडे दूरचे नातेवाईक : मलिक
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे आणि आरोप केले जात आहेत. अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा पुरावा म्हणून त्याच्या जन्माचा दाखला ट्विटरवरून शेअर करत या प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक आरोप केलाय. वानखेडे यांनी मुस्लीम असल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला.