Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीदेगलूरची पोटनिवडणूक मराठ्यांच्या अस्मितेची लढाई : आमदार नितेश राणे

देगलूरची पोटनिवडणूक मराठ्यांच्या अस्मितेची लढाई : आमदार नितेश राणे

नांदेड (वार्ताहर) : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक ही मराठ्यांच्या अस्मितेची लढाई असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ राणे यांनी अटकळी, देगलूर, कुशावाडी, मरतोळी, लोणी येथे रविवारी सभा घेऊन मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.

विद्यमान सरकारने मराठ्यांवर कायम अन्याय केला आहे. मराठा आरक्षण देण्याबाबतच्या चालढकलीवरून याचा अंदाज येतो. मराठा समाजाला कुणीही कमी लेखू शकत नाही. मराठ्यांची ताकद आणि एकजूट या निवडणुकीत दाखवून द्या. सरकारविरोधी राग व्यक्त करायचा असेल तर सुभाष साबणे यांना जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन आमदार राणे यांनी यावेळी केले.

सुभाष साबणे यांनी शिवसेना सोडल्याची बातमी मी पूर्णपणे वाचली. तसेच त्यांची मुलाखतही पाहिली. यावेळी मला राणे साहेबांची आठवण झाली. षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान कट्टर आणि सच्चा शिवसैनिकावर होणाऱ्या अन्यायाबाबत जाहीरपणे सांगितले. साबणे यांना सेना सोडताना अश्रू अनावर आले. पालकमंत्र्याला काळे झेंडे दाखवले म्हणून एका शिवसैनिकाला पायदळी तुडवण्यात आले. प्रामाणिक शिवसैनिक अन्याय कधीच सहन करू शकत नाही. ३६ वर्षे नेकीने काम करूनही अन्याय का सहन करायचा, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थितांना केला.

सुभाष साबणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. साबणे यांना भाजप प्रवेश करताना अश्रू अनावर आले. त्यावेळी चव्हाण यांनी मगरीचे अश्रू असे म्हटले. साबणे यांना गद्दार म्हणणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे. पक्ष कसा उभा राहतो, हे तुम्हाला कळणार नाही. तळागाळातील कार्यकर्ता समजून घेणे सोपे नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याशी जवळून संवाद साधावा लागतो. तुम्ही तुमच्या तळागाळातील कार्यकर्त्याना भेटाल, त्यांची विचारपूस कराल, तेव्हा त्यांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज येईल, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी अशोक चव्हाण यांना दिला.

शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब अशी निवडणूक

देगलूर-बिलोली पोटनिवडणूक औरंगजेब विरुद्ध शिवाजी महाराज अशी आहे. राज्यात हिंदू असुरक्षित आहे. औरंगजेबचे छायाचित्र व्हायरल झाल्याने उस्मानाबाद दंगलीमध्ये आपल्या पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली. ठाकरे सरकारला बांगलादेशमधील हिंदूंची चिंता आहे. मात्र, उस्मानाबाद दंगलीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उस्मानाबाद शहरात मंगळवारी विजय चौक येथे झेंडा लावण्यावरून २० ऑक्टोबरला दोन गटांत वाद झाले. मंगळवारी रात्री झालेल्या वादाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणावात भर पडली. वाद मिटवण्यासाठी पोलीस गेले असताना त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. त्यात एका पोलीस निरीक्षकासह सहा कर्मचारी जखमी झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -