अनिकेत देशमुख
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सव झाल्यानंतर विसर्जन करण्यात आलेल्या सोळाशे घटांचा झाडे लावण्याकरता व सुशोभीकरणासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवात दुर्गा पूजन मूर्तीचे तसेच घटांचे विसर्जन शहरात ठिकठिकाणी भाविकांकडून करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण संकल्पने नुसार अंदाजे १६०० घटांचे संकलन करून त्या घटांचा सुशोभीकरणासाठी तसेच झाडे लावण्यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.
मीरा-भाईंदर शहरात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचा नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मूर्ती व घटाच्या विसर्जनासाठी पालिकेमार्फत शहरात स्वीकृती केंद्र उभारण्यात आली होती. नागरिकांमार्फत दसऱ्या दिवशी घरात बसवलेले घट स्वीकृत केंद्रावर विसर्जना करता देण्यात आले. शिवारगार्डनच्या तलावात दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले असून त्यातील घट स्वच्छ पुनर्वापरासाठी पालिकेच्या स्वछता निरीक्षक अनिल राठोड यांच्या देखरेखीखाली वेगवेगळे करण्यात आले आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त मुठे यांनी पालिकेच्या गार्डन विभागाला १६०० मडक्यांमध्ये झाडे लावण्याचे आदेश दिले असल्याचे स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांनी सांगितले आहे. यामुळे यावर्षी पालिका अतिशय चांगल्या प्रकारे घट व मडकी यांचा वापर करून पुन्हा त्यांना कामात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.