बोईसर (वार्ताहर) : देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई-वडोदरा या आठपदरी द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यात आवश्यक भूसंपादनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील एकूण अंतर ७८ किलोमीटर असून यासाठी सुमारे ९०१ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ५१ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. या द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात पालघर तालुक्याने आघाडी घेतली असून जवळपास ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती प्रांतअधिकारी धनाजी तोरस्कर यांनी दिली आहे.
मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेसाठी पालघर तालुक्यातील २७ गावे बाधीत होणार असून एकूण ३७.४ किलोमीटरचा मार्ग तालुक्यातून जाणार आहे. यासाठी एकूण ४२६ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून यामध्ये ७६ हेक्टर वनजमीन तर, ३५० हेक्टर खासगी जागा लागणार आहे. दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे भूसंपादन प्रक्रियेला ब्रेक लागला होता. परंतु, कोरोनाचा प्रभाव ओसरू लागताच पालघर प्रांत कार्यालयामार्फत पुन्हा एकदा युद्धपातळीवर भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले असून आतापर्यंत पालघर तालुक्यात २५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी जवळपास ३ हजार बाधित शेतकरी आणि जमीन मालकांना त्यांचा मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित संपादित होणाऱ्या काही हेक्टर खासगी जमिनीचे दावे न्यायालयात सुरू असून तेसुद्धा येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत निकाली काढून १०० टक्के भूसंपादन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
सुरुवातीला या एक्स्प्रेसवेसाठी आपल्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेसुद्धा करण्यात आली. मात्र, पालघरचे प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी तहसीलदार सुनील शिंदे व मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सोबतीने विरोध असलेल्या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी विशेष बैठका घेतल्या. तसेच, संपादित जमिनीपोटी उत्तम भाव मिळत असल्याने बऱ्याचअंशी शेतकऱ्यांचा विरोध मावळून भूसंपादन प्रक्रियेला चांगली गती आली आहे. जवळपास एकूण सातशे कोटींच्या आसपासची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार होती. त्यातील पाचशे कोटी रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे.
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे प्रकल्पाची भूसंपादनाची प्रक्रिया जलद सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भूसंपादन करते वेळी लाभार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेला योग्य व उचित मोबदला देण्यास तत्काळ प्राधान्य दिल्याने भूसंपादनाची प्रक्रिया जलद होत आहे. – धनाजी तोरस्कर, उपविभागीय अधिकारी पालघर तथा स.प्रा.अ.मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे
वाढीव, नवघर, घाटीम, पेंनद, सोनावे, पारगाव, गिराळे, नगाव, नावझ, साखरे, दहिसर, खामलोली, धुकटण, गोवाडे, मासवण, वांदीवली, वाकडी, वसरोली, काटाळे, लोवरे, निहे, नागझरी, लालोंडे, किराट, बोरशेती, रावते, चिंचारे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…