नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतात आजच्या सारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनचे (आयएसपीए) व्हर्चुअली उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले.
२१व्या शतकातील भारत आज ज्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे त्याचा आधार भारताच्या सामर्थ्यावर अतूट विश्वास हा आहे. भारताचे सामर्थ्य जगातल्या कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. या सामर्थ्यापुढे येणाऱ्या प्रत्येक व्यत्ययाला दूर करण्याचे काम आमच्या सरकारचे आहे. आज जेवढे निर्णायक सरकार देशात आहे तेवढे याआधी कधीही नव्हते, असे मोदी म्हणाले.
अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, त्याचा इंडियन स्पेस असोसिएशन हा दुवा आहे. भारतीय स्पेस असोसिएशनच्या स्थापनेसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. जेव्हा आपण अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा आमचा दृष्टिकोन चार खांबांवर आधारित असतो. प्रथम, खाजगी क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण स्वातंत्र्य, दुसरे, सक्षम करणारे म्हणून सरकारची भूमिका, तिसरे, तरुणांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अवकाश क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे. १३० कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी आपले अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे, सामान्य माणसासाठी सुधारित मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी!, उद्योजकांसाठी शिपमेंटपासून डिलिव्हरीपर्यंत चांगली गती, असे पंतप्रधानांनी म्हटले. भारताला नवनिर्मितीचे नवीन केंद्र बनवावे लागेल. भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे
ज्यांच्याकडे एंड टू एंड टेक्नॉलॉजी आहे. आम्ही कार्यक्षमतेला ब्रँडचा अविभाज्य भाग बनवले आहे. मग ती अंतराळ संशोधनाची प्रक्रिया असो किंवा अवकाशाचे तंत्रज्ञान. आपल्याला ते सतत शोधायचे आहे. आत्मनिभर भारत’ दृष्टीने आपला देश व्यापक सुधारणांचा साक्षीदार आहे. ही केवळ दृष्टी नाही, तर एक सुविचार आणि एकात्मिक आर्थिक धोरण आहे ज्यामुळे जागतिक विकास सुलभ होत आहे,” असेही मोदींनी यावेळी म्हटले.
एअर इंडियाबाबत घेतलेला निर्णय आपली बांधिलकी आणि गांभीर्य दर्शवतो असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. जिथे गरज नाही तिथे सरकार नियंत्रण संपवणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.