Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीअंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वीस टक्के वाढ केल्याची घोषणा शुक्रवारी पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. मात्र, ही मानधनवाढ कमी आहे, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यात सरकार कमी पडत आहे, असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुरुवातीला दहा टक्के वाढ करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्या. त्यानंतर या मानधनात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सध्या महाराष्ट्र देशात सात ते आठव्या स्थानी आहे. आता त्यात वाढ झाल्यानंतर आपण देशात चौथ्या स्थानी येऊ, अशी माहिती यावेळी लोढा यांनी दिली. सध्या अंगणवाडी सेविकांची २० हजार १८३ पदे रिक्त आहेत. या पदांची एक जानेवारीपासून भरती सुरू होणार असून, ते मे पू्र्वी भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांसाठी दीडशे कोटी रुपये खर्चून नवे मोबाइल खरेदी करणार आहोत. अंगणवाड्यांचे भाडे एक हजारावरून दोन हजार रुपये केले आहे. महापालिका हद्दीतील भाडेवाढीचा निर्णय लवकर घेणार आहोत. राज्यात प्रायोगित तत्त्वावर कंटेनर अंगणवाडी सुरू करणार असून, पहिल्या अंगणवाडीचे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांना पूर्वी मोबाइलमध्ये माहिती भरताना ती इंग्रजीत भरावी लागायची. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सेविकांना फक्त त्यांचे नाव इंग्रजीत टाकावे लागेल. त्यानंतर इतर माहिती मराठी भरता येईल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. सध्या महागाई वाढली आहे. गॅस दर वाढले आहेत. हे पाहता अंगणवाडी सेविकांचे मानधान १५ हजार आणि मदतनीसांचे मानधन १० हजार करावे, अशी मागणी केली. विरोधकांनी ही मागणी करत या मुद्यावरून सभात्याग केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -