भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल, स्वातंत्र्यवीरांगना आणि ‘नाइटिंगेल ऑफ इंडियन साँग’ या पदवीने जगाला परिचित असणा-या सरोजिनी नायडू यांचा आज जन्मदिन. १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे सरोजिनी अघोरनाथ चटोपाध्याय यांचा जन्म झाला. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असणा-या सरोजिनीदेवींचा इंग्रजी काव्यात विशेष अभ्यास होता. उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. परतल्यानंतर जात, पंथ, वय आणि लोकप्रवादांच्या सीमा ओलांडून त्यांनी डॉ. नायडूंशी विवाह केला. तत्त्वचिंतन आणि गूढगुंजन करणारी त्यांची इंग्रजी कविता असे. १८९८ ते १९१७ या काळात त्यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. म. गांधी आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या संपर्कात आल्यानंतर त्या गांधी आणि काँग्रेसच्या समर्थक झाल्या. होमरूल लीगच्या प्रसारासाठी देशभर फिरत असतानाच असहकार चळवळीत त्या सहभागी झाल्या. १९०८ मध्ये भरलेल्या ‘विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९२५ च्या कानपूर काँग्रेसच्याही अध्यक्ष झाल्या. १९२९ मध्ये ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्याही अध्यक्ष झाल्या. १९४७ मध्ये आशियाई राष्ट्रपरिषदेच्या अध्यक्ष तसेच स्वातंत्र्यानंतर पहिल्या स्त्री राज्यपाल झाल्या. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्या अविरत प्रयत्नशील होत्या.
दि. २ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.