Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीWomens' day : कर्तृत्ववान महिलांसह प्रहारच्या गजाली...

Womens’ day : कर्तृत्ववान महिलांसह प्रहारच्या गजाली…

नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने सगळीकडे महिलांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यात आला. दै. प्रहारच्या व्यासपीठावरही अशाच कर्तृत्ववान महिलांनी भेट दिली. यावेळी दै. प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, लेखा विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत तसेच संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा लेखाजाेखा‘गजाली’मध्ये मांडण्यात आलाय.

रंग माझा वेगळा…

सीमा पवार

प्रहारच्या गजाली या व्यासपीठावर जागतिक महिला दिनानिमित्त पाच महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. या पाचहीजणी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या होत्या. या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी एक निवेदिका पूजा काळे. त्या दिवशी जमलेल्या प्रत्येकीच्या कार्याचा सन्मान करत, स्त्री आज कोणत्याही क्षेत्रात पुढे जात असताना स्वतःबरोबर इतरांनाही आपल्यासोबत नेत पुढचे पाऊल उचलत असते. त्यामुळे इथे असलेल्या या प्रत्येकीला आज ऐकायचे आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी असे म्हणावसे वाटते की, रंगूनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा… या इथे हळूच आवरू भावनांचा पाचोळा… या एका छोट्याशा काव्यपंक्तीने जमलेल्या त्या साऱ्याजणींना निवेदिका पूजा काळे यांनी आपल्या शब्दफुलांनी सन्मानित केले. त्यादिवशी तिथे आलेली ‘ती’ वेगवेगळ्या क्षेत्रातील होती, पण प्रत्येकीला आपल्यात सामावून घेत प्रत्येकीचे कर्तृत्व हे त्या प्रत्येकीच्या जागी किती मोठे आहे हेच सांगण्याचा पूजा यांचा प्रयत्न होता आणि तो त्यांनी निवेदिका म्हणून सिद्धही करून दाखवला.

स्त्रीमध्ये असलेल्या दया, माया, ममता, करुणा या सगळ्या भावनांचा एक संचय केला की छान बुके होतो. तो म्हणजे जागतिक महिला दिन. कर्तृत्ववान स्त्रियांना सलाम करण्याचा दिवस. ती कौतुकाची थाप प्रहारकडून मिळाली याच मोठं समाधान असल्याचं म्हणायला त्या विसरल्या नाहीत. पूजा यांनी स्त्री मुळात कर्तृत्ववान आहेच हे सांगताना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत आणि मुक्तपणे आपण उडत आहोत त्यामुळे या दिवशी त्यांचे आभार मानले.


निवेदिका म्हणून ओळख असलेल्या पूजा काळे यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काय करावे? हा प्रश्न कधी पडला नाही. त्यांनी मराठी वाड्मयाचा अभ्यास केल्यामुळे मराठी विषयावर चांगला पगडा होता. त्यांनी रूपारेल महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यांना इथे चांगले प्राध्यापक लाभले. अभिवाचनाचे कार्यक्रम व्हायचे आणि आवाजाची एक चांगली देणगी होती. घरात आई-बाबांकडून भजन, कीर्तन कानावर पडत होती. एकूणच घरातील वातावरण धार्मिक होते. त्यामुळे आणखी काही करण्यापेक्षा आपणही याच क्षेत्रात जावे म्हणून मग इकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आकाशवाणीवर जाहिरात ऐकली होती की, निवेदिका हवी आहे. त्यामुळे आपणही इथे जाऊन बघावं म्हणून गेले. तिथे गेल्यानंतर मनात अनेक प्रश्न होते. हे आपल्याला जमेल की नाही, पण मनात एक विश्वास होता आपल्याला पुढे जायचे आहे. ऑडिशन दिले ते पास झाले. ऑडिशन हा एक भीतिदायक प्रकार असतो. दुसरी परीक्षाच असते ती. तीन टप्पे पार केले. एक रिटर्न असते, तोंडी परीक्षा होते. समोर काही दिग्गज असतात. अतिप्राचीन प्रश्न विचारले जातात. काही गोष्टींचा तर आपण अभ्यासही केलेला नसतो. पण आत्मविश्वास होता. त्यानंतर तोंडी परीक्षा. मग एखादा नाट्यानुभव, एखाद् सादरीकरण किंवा एखादा विषय दिला जातो, एखादा उतारा असतो तो वाचून दाखवायचा असतो. तोही टप्पा पार केला आणि या क्षेत्रात आले. आकाशवाणीला बरेचसे कार्यक्रम होते. ते करण्याचा एक आनंद होता. त्यानंतर दूरदर्शनला वळले. पण इथे तुम्ही साचेबद्ध दिसणे, बोलणे, वागणे महत्त्वाचे असते. बोलीभाषा, देहबोली, या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केला जातो.

अनेक क्षेत्रांतील तळपती समशेर

वैष्णवी भोगले

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आज अनेक स्त्रिया ह्या एकमेकांच्या साहाय्याने आपली कामगिरी सांभाळत पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.लहानपणापासून कायम मनात आदरयुक्त भीती असलेल्या खाकीवर्दीला आणि शिस्तीला बघून आपलीही ओळख लालदिव्याच्या गाडीतून फिरताना झाली पाहिजे, अशी इच्छा उराशी बाळगून रूपाली साळुंखे या वयाच्या २३ व्या वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस नेहमीच आपल्याला सतर्क करत असतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये सायबर गुन्हे हे विशेषकरून हॅकिंग, ई-मेलद्वारे होणारा छळ, सायबर स्टॉकिंग, सायबर पॉर्नोग्राफी, सायबर डीफमेशन, मॉर्फिंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. त्यामुळे त्यांनी सर्वांनाच सायबर गुन्ह्यांपासून शक्य तेवढे सावध राहण्याचा संदेश दिला.

एखादी सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास १९३० या नंबरवर सर्वांनी संपर्क करण्याचे सांगितले. मुंबईतील वांद्र येथील खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करताना समाधान मिळते. अन्य कॉर्पोरेट क्षेत्रासारखी ९ ते ५ अशी कामाची वेळ पोलीस स्टेशनला नसते. एकदा घरातून स्त्री बाहेर पडली की ९ ते ८ ड्युटीसाठी दिवसरात्र या महिला ड्युटी करतात. तसेच एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर त्या गोष्टीसाठी चिकाटी, मेहनत आणि सातत्य ठेवा. परिश्रम घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नसते असा नव्या पिढीसाठी ऊर्जेचा संदेश दिला.

सीनियर सिटिझन कॉन्सेप्ट हा एक संवेदनशील विषय आहे. पोलीस स्टेशनला वयस्कर मंडळींचा डेटा असतो. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना भेट देतो. आठवड्यातून नेहमी आम्ही ६२ वर्षे पुढे वय असलेल्या मंडळींना भेट देतो. त्यांच्याशी गप्पागोष्टी, विचारपूस करतो. ती मंडळी असे सांगतात की, आम्ही आमच्या मुलांना खूप शिकवले, आम्हीही खूप शिकलो, पैसाही कमी नाही पण म्हातारपणी सोबत कोण नसल्याची खंत आहे. ते जेव्हा त्यांची परिस्थिती सांगतात तेव्हा खूप वाईट वाटते. त्यामुळे निर्भया पथकामुळे वयस्कर मंडळींच्या संवेदनशील भावनांशी जोडले गेलो असल्याचे रूपाली साळुंखे यांनी सांगितले.

तर डॉ. वसुंधरा गळधन या बीएमसीमध्ये एफ नॉर्थला मेडिकल अधिकारी आहेत. स्त्री आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पुढे गेली आहे. काही वर्षांपूर्वी परिस्थिती फार बिकट होती. आता परिस्थिती बदलून पुरुषही स्त्रियांना पुढे जाण्यासाठी हातभार लावत आहेत. त्यामुळेच स्त्री मुक्त संचार करू शकते. तिला हवे ते क्षेत्रात ती पुढे जात आहे. तसेच त्यांनी सांगितले की, माता बालसंगोपन बच्चूंसाठी व्हॅक्सिनेशन, गर्भवती महिलांसाठी सरकारी दवाखान्यामध्ये योजना राबविल्या असल्याचे सांगितले. सरकारच्या योजना स्त्रियांसाठी फार उपयुक्त आहेत. त्यांचा सर्वच स्त्रियांनी लाभ घ्यावा. गर्भवती महिलांना पहिली मुलगी झाल्यास ५०००, तर दुसरी मुलगी झाल्यास ६००० रुपये सरकारकडून दिले जातात. प्रत्येक स्त्रीला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. यासाठी महिलांनी सरकारच्या योजनांची माहिती घेऊन त्या अमलात आणल्या पाहिजेत. जे आपल्या हातात आहे त्यातून आपण नवीन काय करू शकतो हे स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे, असे डॉ. वसुंधरा गळधन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आराेग्य विभागात काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कर्तृत्वाची माहिती दिली. आराेग्यक्षेत्रातही महिला आज आघाडीवर आहेत. नर्स म्हणून तर महिलांची संख्याच सर्वाधिक आहे. आजची स्त्री सक्षम आहे, माता बालसंगाेपन, लसीकरण, गराेदर महिलांसाठी शासनाच्या असणाऱ्या अनेक याेजनांची माहिती दिली. शासनाच्या याेजना लाेकांपर्यंत पाेहाेचल्या नाहीत, याची खंत त्यांनी बाेलून दाखवली. काेविडमध्ये अंगवाडी सेविका, आशाताई आणि स्वयंसेविकांनी सुंदर काम केले आहे. वैद्यकीय सेविका आता आपल्या घरापर्यंत पाेहाेचतात. मेिडकल फिल्डमध्ये स्त्रियांना खूपच संधी आहेत. अनेक विधवा महिला, एकट्याने घर सांभाळणाऱ्या महिला या क्षेत्रात झाेकून देऊन काम करतात. माता बाल संगाेपनात महिलांचा माेठा वाटा आहे हे त्यांनी अधाेरेखीत केले.

‘ती’च्यातील ‘मी’ला जागवणाऱ्या ‘त्या’ राज्ञी

मानसी खांबे

काही महिला या चाकोरीबाहेर जाऊन महिलांच्या प्रगती, प्रबोधनासाठी झटत असतात. वैशाली गायकवाड, गायत्री डोंगरे या दोघी याच पंक्तीतल्या. राज्ञी वुमेन वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून महिला वर्गासाठी महिला महोत्सव राबवून पुस्तक वाचनालय, विविध खेळ, हळदीकुंकू यांचे आयोजन करण्यात या दुकलीचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेच्या कामाची जंत्री लांबलचक आहे. हे सारे संस्थेच्या संचालिका वैशाली गायकवाड, समन्वयक गायत्री डोंगरे यांच्या तोंडून ऐकताना या संस्थेचा प्रवास किती थक्क करणारा आहे आणि त्याकरिता वर्षभर या दोघी किती झटतात हे समजले. ही संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे.

व्यास क्रिएशन प्रकाशन संस्थेसोबत काम करत असताना समाजाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या स्त्रीसाठी काही करता येईल का?… असा विचार मनात रुजला. त्यातूनच मग २०२० या कोरोनाच्या काळात ‘ती’च्यातल्या ‘मी’साठी ‘राज्ञी वुमेन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली. स्त्रियांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणे, मोकळे जगण्यासाठी, आवडी-निवडी जपण्यासाठी, तिच्या कलागुणांना संधी देण्यासाठी राज्ञी हे ‘व्यासपीठ’ आहे. फारच कमी कालावधीत या संस्थेच्या कार्याचा आलेख उंचावत गेला आहे. त्यामुळेच दिवसागणिक स्त्रियांनी सहभाग वाढत असून आजच्या घडीला १५०० हून अधिक सभासदांची नोंद आहे.

 

संस्थेमार्फत सर्व सभासद स्त्रियांसाठी वर्षभरात विविध स्पर्धा, उपक्रम, सोहळे, कार्यशाळा, व्याख्यान, मार्गदर्शन शिबीर आणि वाचनकट्टाचे आयोजन केले जाते. अक्षयवान सोहळा म्हणजेच संक्रातीचे हळदीकुंकू, तीनदिवसीय महिला महोत्सव, पुस्तक आदान-प्रदान, बोंडला, मंगळागौर आणि दीपोत्सव या मुख्य ६ सोहळ्यांचा समावेश असतो. त्यासह व्यावसायिक मार्गदर्शन, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी देखील राज्ञी नेहमी कार्यरत असते. व्यास क्रिएशन प्रकाशन संस्थेमार्फत पुस्तक बीसी योजनेचा संकल्प करण्यात आला. जेव्हा एक स्त्री पुस्तक वाचते तेव्हा अख्खं कुटुंब तिच्यासोबत वाचन संस्कृतीत रुजलं जातं. वाचन संस्कृतीचे बीज तिच्यापासून रुजावे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली. संवादाला दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महिलांमध्ये संवाद कौशल्य गुण विकसित व्हावेत याकरिता संस्थेमार्फत कौशल्य कार्यशाळा घेतल्या जातात. तसेच संस्थेमार्फत होणाऱ्या निबंध, घोषवाक्य, चित्रकला, वेशभूषा, पथनाट्यसारख्या विविध स्पर्धांमध्येही समाजातील गृहिणींपासून ते शिक्षिका, डॉक्टर, तृतीयपंथी अशा प्रत्येक स्तरातील महिलांचा सहभाग असल्याचे वैशाली गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या उपक्रमांचा आलेख एवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्याला सामाजिक कार्याचीही किनार आहे. राज्ञीमार्फत आश्रम आणि दिव्यांग मुलांच्या शाळांमध्ये भेट देऊन त्यांच्या सोबत रक्षाबंधन, पुस्तक हंडी सारखे विविध सण, उपक्रमाचे आयोजन केले जाते. आनंद, उत्सव, उत्कर्ष अशा त्रिसूत्रांवर काम करणारी राज्ञी ही संस्था स्त्रियांचं माहेरघर असून ‘ती’च्यातील ‘मी’ साठीच जगण सुसह्य होण्याचा प्रयत्न करत असल्याचे वैशाली गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

दरवर्षी राज्ञीतर्फे महिलांसाठी विशेष कस्तुरी अंकाचे आयोजन केले जाते. राज्ञीमधील महिलांना लिहिते करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात असल्याचे गायत्री डोंगरे यांनी सांगितले. उद्यावर ढकलली जाणाऱ्या ऑफिसच्या कामांप्रमाणे गृहिणींना घरातली कामे उद्यावर ढकलता येत नाहीत. गृहिणींनी मी घरातील कामे करते या गोष्टीचा अभिमान बाळगावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -