नॅपियर (वृत्तसंस्था) : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील (T-20 series) मंगळवारी खेळली गेलेली शेवटची लढत पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईस मेथडनुसार अनिर्णित राहिली. ही लढत बरोबरीत सुटल्याने दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेणाऱ्या भारताने १-० ने मालिका खिशात घातली.

न्यूझीलंडने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ९ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात ७५ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवसह भारताचे आघाडीचे चार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. संकटात सापडलेल्या भारतासाठी कर्णधार हार्दिक पंड्या धावून आला. त्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंड्या ३० धावांवर खेळत होता.

मात्र पावसाने बॅटींग सुरू केल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला. पावसाने व्यत्यय आणल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निर्णय लावण्यात आला. त्यानुसार हा सामना अनिर्णित राहिला. तीन सामन्यांतील दोन सामन्यांचा खेळ पावसाने खराब केल्याने एक लढत जिंकणाऱ्या भारताने मालिका विजयाचा चषक उंचावला.

तत्पूर्वी न्यूझीलंडने २० षटकांत १६० धावा जमवल्या होत्या. त्यात यष्टीरक्षक, सलामीवीर देवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. भारताच्या मोहम्मद सिराजने सर्वांनाच अचंबित केले. त्याने चार षटके फेकत केवळ १७ धावा देत ४ बळी मिळवले. अर्शदिप सिंगनेही प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ३७ धावा देत ४ बळी मिळवले.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या तुफानी फलंदाजीने भारताला मोठा विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

इतिहासातील तिसराच डीएलएसनुसार अनिर्णित सुटलेला सामना

विशेष म्हणजे डीएलएस मेथडने शक्यतो सामना अनिर्णित सुटत नाही. पण मंगळवारचा सामना बरोबरीत सुटला असून विशेष म्हणजे इतिहासातील हा तिसराच असा डीएलएसनुसार अनिर्णित सुटलेला सामना आहे. याआधी २०२१ मध्ये नेदरलँड विरुद्ध मलेशिया आणि माल्ता विरुद्ध गिब्रल्टार असे दोन सामने डीएलएस मेथड वापरुनही अनिर्णीत सुटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here