शिक्षण हे जीवन उमलविण्याचे साधन आहे. त्यातून कोमजणे सुरू झाले तर पुनश्च विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणातील तणावातून होणारी ही पानगळ थोपविण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे.

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकाने मारले. त्याचा राग मनात धरून आठवीत शिकत असलेल्या मुलीने सोलापूरमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. शिक्षणात परीक्षा आणि मार्क यांच्या दबावातून आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने मुले तणावात आहेत. त्याचबरोबर सर्वच व्यवस्था शिक्षणाच्या मूलभूत अर्थापासून दूर जात आहे. शाळा देखील गुण आणि खोटय़ा प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करू लागल्याने आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पनाच्या व्याख्या बदलू लागल्याने विद्यार्थी टोकाची पावले उचलू लागली आहेत. गेले काही वर्षे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा आलेख वाढतो आहे. यावरती चिंतनाची गरज निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण. विद्यार्थ्यांमध्ये जे दडले आहे ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण आहे. रस्किनच्या उपत्तीनुसार प्रत्येक दगडात एक मूर्ती दडलेली आहे. त्या दगडातील नको असलेला भाग फक्त मूर्तिकाराने दूर करायचा असतो, म्हणजे ती मूर्ती देखणी व सुंदर तयार होत असते. शिक्षणात यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही. विद्यार्थी जाणून घेणे, त्याचा कल लक्षात घेऊन अध्ययन अनुभव देणे. विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पृष्ठभूमी जाणून घेऊन अनुभवाची रचना केली, तर शिकण्यातील रस आपोआप वाढेल. विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीला शिक्षणात उपयोगात आणण्याची क्षमता नसेल, तर विद्यार्थी त्या शक्तीचा विनियोग अन्य मार्गाने करतात. शिकण्यात मन रमले तर बेशिस्तीचा प्रश्न आपोआप सुटेल. विद्यार्थ्यांचा शिस्तीचा प्रश्न धाक आणि मारहाणीने मिटण्याची शक्यता नाही. अशा स्वरूपात विद्यार्थी जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा तो बदलाचा भाग असतो. विद्यार्थ्यांना रागावून, मारहाण करून शिक्षणात गुणवत्ता आणता येत नाही. शिक्षणाचा मार्ग विद्यार्थ्यांवरील प्रेमातून जात असतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते जितके भक्कम असेल तितके शिकणे गुणवत्तापूर्ण होते. धाक नको, तर आदर हवा. त्यासाठी आईच्या ममत्वाने शिक्षण प्रवास घडवावा लागेल. म्हणून शिक्षण हक्क कायद्यात शिक्षेस प्रतिबंध करण्यात आला आहे.

शिक्षणाने बदलाच्या मागे न लागता परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठी विचारपेरणी करावयाची असते. विद्यार्थ्यांला गुण कमी पडले असतील, तर त्याला केवळ विद्यार्थी जबाबदार आहे असे नाही. त्याला एखादा घटक समजला नसेल तर तो घटक नव्या अध्ययन अनुभवाने पुन्हा रुजवायला हवा असतो. त्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातून प्रत्येक टप्प्यावरती विद्यार्थी प्रगती जाणून घेणे, मागे पडलेल्या क्षेत्रात त्याला मदत करणे अपेक्षित आहे; मात्र मूळच्या विचारप्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याने या सारख्या प्रसंगांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोणतीही परीक्षा ही केवळ विद्यार्थी काय, कसा, किती शिकला आहे हे जाणून घेण्याचे साधन आहे. त्यामुळे एखाद्या विषयात विद्यार्थ्यांला गुण नाही मिळाले, तर तयारी करून गुण मिळविता येतील; पण त्याच्यातील गुणांच्या परिपोषणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाने सातत्याने भरण करण्याची प्रक्रिया करावयाची असते. शिक्के मारण्याची व्यवस्था शिक्षणात अपेक्षितच नाही; मात्र शिक्के मारले जात असल्याने शिक्षणाने प्रश्न सोडविण्याची क्षमता गमावून बसल्याने शिक्षणच समस्यामय बनू लागले आहे की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. विद्यार्थ्यांचे गुण हे जीवनाची अंतिम साध्यता नाही, हे लक्षात आणून देणार की नाही? गुणांच्या भोवती खोटय़ा प्रतिष्ठेचे वर्तुळ विकसित केले जात आहे.

शाळांची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासापेक्षा गुणांच्या टक्केवारीवर मोजली जात आहे. त्यामुळे शिक्षकही तणावात येत आहेत. त्यातून मारहाणीचे प्रसंग उद्भवतात. विद्यार्थ्यांना गुण हेच शिक्षणाचे व जीवनाचे अंतिम सत्य आहे, असे वाटू लागल्याने कमी गुण म्हणजे जणू जगण्यास पात्र नाही, असे समजले जाऊ लागले आहे. सामाजिक माध्यमामुळे व्यक्त होणे वाढले असले, तरी त्यात आभासी स्वरूप खूप आले आहे. अपमान गिळण्याचे शिकविणे राहून जात आहे. अतिरिक्त काळजीने विद्यार्थी अपंग बनत आहेत. घरातील आजी-आजोबा यांचे स्थान हरवत चालले आहे. विभक्त कुटुंबपद्धतीने मानसिक, भावनिक भरणच होत नाही. त्यामुळे विद्यार्थी असे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. मुलांच्या भौतिक गरजा पूर्ण होतात; मात्र भावनिक भरणाच्या रितेपणाने छोटासा नकारदेखील मुलांच्या जिव्हारी लागतो आहे. त्यातून मुलांच्या आत्महत्या वाढत आहेत. शिक्षण हे जीवन उमलविण्याचे, पुष्ठलविण्याचे साधन आहे. त्यातून कोमजणे सुरू झाले तर पुनश्च विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणातील तणावातून होणारी ही पानगळ थोपविण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे.