मीना कुलकर्णी

मराठी माणूस हा संस्कृतीप्रिय आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत येणारे सगळे सणवार आणि उत्सव तो उत्साहात साजरे करतो. पण यामागे केवळ ईश्वरभक्तीचा भाबडेपणा, कर्मकांड किंवा उत्सव साजरा करणं एवढीच कारणं नसून याला विज्ञानाचा फार मोठा आधार आहे, हे विचारवंत माणसाला आता पूर्णपणे ज्ञात झालं आहे. या सगळ्या सणावारांचा शिरोमणी, म्हणजे चातुर्मास! यात सगळ्या नात्यातल्या प्रेमाचा उत्सव साजरा करण्याची पर्वणी मिळत असते. यात सगळीच नाती-सण येतात. बहीण-भावाच्या प्रेमाची राखी पौर्णिमा, दिवाळीतला पती-पत्नीच्या प्रीतीचा पाडवा यांसारखे अनेक सण कौतुकाने साजरे केले जातात. इतकंच काय, शेतात नांगरणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळ्याचा सणसुद्धा साजरा केला जातो. कृतज्ञता ही तर आपल्या संस्कृतीची माय माऊलीच आहे!

चातुर्मासातला प्रेम आणि भक्तीचा सोहळा निसर्गही उत्साहाने अनुभवतो. पावसाच्या सरी धो-धो कोसळतात, झाडांचं हिरवेगार दर्शन सुखावतं, हवाही थंडगार झुळझुळ वाहत असते… पण अशा या सुंदर हवेत आपल्याला आपली प्रकृती, विशेषतः पचनसंस्था मात्र सांभाळावी लागते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मोठ्या चातुर्याने या हवेला पोषक ठरतील, असेच पदार्थ सणावाराला देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा पाडली. शिवाय सणांच्या निमित्ताने प्रियजनांना आपण भेटतो, स्तोत्रपठणाच्या स्पष्ट उच्चाराने तोंडाच्या व परिणामाने मेंदूच्या स्नायूंना व्यायाम होतो! मंत्र आणि पूजाअर्चा केल्याने मनाची शांतीही सहज मिळते. यासाठी अनेक पूजा, अर्थपूर्ण व्रतवैकल्यं सांगितली आहेत. निसर्गामध्ये सर्जनसोहळा साजरा होत असताना ती संपन्नता राजसपणे अनुभवावी, मंगलवाणीचं उच्चारण करत शेतातल्या पिकांचं पोषण व्हावं, बहरलेल्या निसर्गाचं देखणपण अनुभवण्यासाठी त्याच्या समीप जातानाही मनात कृतज्ञ आणि कृतार्थ भाव असावा, या हेतूने या काळाचं वेगळं महत्त्व लक्षात घ्यायला हवं. चातुर्मास हे एक व्रत आहे. विविध पुराणांमध्ये व्रताची व्याख्या दिली आहे. व्रताची परंपरा स्मृतीकाळापासून आहे. व्रतामध्ये निश्चित काळ, दिवस, पूजाविधी, उपासना या सर्व बाबींना विशेष महत्त्व असतं. याच धर्तीवर चातुर्मास हे एक व्रत पाळलं जातं. याचा आरंभ आषाढ शुद्ध एकादशी, द्वादशी अथवा पौर्णिमेला होत असल्याचं ‘कालविवेक’ या संस्कृत ग्रंथात सांगितलं आहे. मात्र चातुर्मासाची समाप्ती कार्तिक शुद्ध द्वादशीलाच करावी. या व्रतांच्या चार महिन्यांच्या काळात बरेच सण-उत्सव, संतांचे स्मृितदिन आणि काही धार्मिक व्रतवैकल्यं साजरी केली जातात.

गरुड पुराणामध्ये चातुर्मास या व्रताचा प्रारंभ कसा करावा, यासंबंधी सविस्तर सांगितलं आहे. त्या दिवशी उपवास करावा, परंपरागत दैवताची पूजा करावी, व्रत करण्याचा संकल्प करावा. या दिवशी विशिष्ट दैवताची पूजा, प्रार्थना, जप करावा, असं सांगितलं आहे. चातुर्मास व्रत पाळताना अभक्ष्य भक्षण, अपेयपान टाळावं. तसंच कांदा, लसूण, वांग्याचं सेवन वर्ज्य करावं. अंडी आणि मासे खाणंही बंद करावं. व्रताचा एक विधी म्हणून श्रावणात शाक (पाले)भाज्या खाऊ नयेत, भाद्रपदात दही खाऊ नये, आश्विन महिन्यामध्ये दूध पिऊ नये आणि कार्तिक महिन्यात सर्व प्रकारच्या डाळी खाणं वर्ज्य करावं. तसंच चातुर्मासामध्ये मध खाऊ नये. पलंगावर झोपू नये. एकादशीला उपवास करावा, सूर्यास्ताच्या आधी भोजन करावं, स्नान घरात न करता तीर्थावर जाऊन गार पाण्यानं करावं. मंदिरात जाऊन पूजा, धर्मग्रंथवाचन, प्रदक्षिणा इत्यादी विधी या काळात सांगितले आहेत. ‘व्रतप्रकाश’ नावाच्या संस्कृत ग्रंथातही या काळात ठरावीक पदार्थ वर्ज्य केल्याने काय साधतं, हे सविस्तर सांगितलं आहे. उदाहरणार्थ, गूळ वर्ज्य केल्यास आवाज मधुर होतो. तेल वर्ज्य केल्यास अवयव निरोगी आणि प्रमाणित आकारात राहतात. अशा पद्धतीने यात आणखी बरीच मोठी यादी दिली आहे. मात्र हल्ली हे सर्व पाळणं कठीण आहे. त्यामुळे शक्य होतील आणि बुद्धीला पटतील, असे नियम पाळून आपण या व्रताचं पालन करू शकतो. व्रतसमाप्तीला म्हणजेच कार्तिक द्वादशीला कुलदैवताची पूजा करावी, भुकेलेल्यांना भोजन घालावं, दक्षिणा द्यावी, व्रतपूजनात काही चूक झाली असल्यास ‘क्षमस्वमे अपराधम’ हा मंत्र उच्चारावा आणि व्रताची सांगता करावी, असं सांगितलं आहे.

वेदकाळात चातुर्मास हे व्रत नसून या नावाचा यज्ञ होता. त्याचा मुख्य पुरावा श्रीविठ्ठलाच्या पंढरीमध्ये यादव काळासंदर्भात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आढळतो. हा यज्ञ फाल्गुन आणि चैत्र पौर्णिमेला करतात. सध्या चातुर्मासात घरी वैश्वदेव नावाचा छोटा यज्ञ करतात. त्याशिवाय आषाढ पौर्णिमेला वरुणप्रधास, साकमेध यज्ञ आणि असेच काही यज्ञ कार्तिक पौर्णिमेला करण्याची पद्धत आहे. हे यज्ञ एखाद्या विशिष्ट तिथी, वार, नक्षत्र यावर केले जातात. पुराणकाळात व्रतविधी लोकप्रिय झाले होते. पण स्मृतीकाळात ते तितकेसे लोकप्रिय नव्हते. अलीकडे धर्म, कुळाचार, कुलपुरुष पूजा यानिमित्ताने अनेक व्रतं अंगीकारली जातात. विशेषत: चातुर्मासामध्ये हे विधी बऱ्याच प्रमाणात असतात. उदाहरणार्थ पक्षपंधरवडा (भाद्रपद), नवरात्र (आशि्वन), गणपती (भाद्रपद), दिवाळी असा महत्त्वाचा काळ यात अंतर्भूत असतो.

आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा आणि व्यासपूजा म्हणून साजरी केली जाते. श्रावणात शिवाची उपासना, श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन, घरोघरी होणारं मंत्रपठण, पूजा, पाठपठण, रुद्राभिषेक, सत्यनारायण पूजा, शिवामूठ वाहणं आदी विधी आनंदपूर्वक होतात. श्रावणात नागपंचमी, मंगळागौर, गोकुळाष्टमी असे उत्सव येतात, जे पारंपरिक पद्धतीने पाळण्याची प्रथा आहे. आषाढामध्ये अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो आणि आपल्या उपयोगी येणाऱ्या या प्राण्याला समाजात काय स्थान आहे, त्याच्याप्रती किती कृतज्ञता आहे हे दाखवून देतो. नागपंचमीला नागपूजन होतं. दसऱ्याला शमी वृक्षाची पूजा होते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्राण्यांची आणि वृक्षांची मानवी जीवनात असणारी महती आपण दाखवून देतो.

माणसाच्या आरोग्याला आहाराचा आधार असतो. त्यामुळे चातुर्मासात सांगितलेले आहाराचे नियमही शरीराला पोषक ठरतात. यात क्षेत्रामध्ये नगरप्रदक्षिणा करण्यास सांगून व्यायामाचे लाभ मिळवण्याची व्यवस्था दिसते. आरोग्यरक्षणासाठी थंड पाण्यानं स्नान करणं आवश्यक असतं. तेच चातुर्मासात पाळलं जातं. उपोषण करून आपण प्रकृती ठणठणीत ठेवू शकतो. म्हणूनच चातुर्मासात उपवासाचे अनेक वार येतात आणि आजही ते पाळले जातात. सूर्योदयापूर्वी स्नानादी विधी आणि सूर्यास्तापूर्वी जेवण हाही आरोग्यरक्षणाच्या कामी महत्त्वपूर्ण ठरणारा कार्यक्रम आहे.
चातुर्मासातील एकादशी, संकष्टी अशी व्रतवैकल्यं अंगीकारताना आपण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यानिमित्ताने दैनंदिन जीवनात, राहण्यात, वागण्यात, खाण्यापिण्यात बराच बदल होतो जो आरोग्याच्या दृष्टीने हितकर असतो. नित्यधर्म वाचनानं आपण ज्ञानसाधना वाढवतो. त्याच्यामुळे मनाची एकाग्रता साधू शकते. एकंदरीत, चातुर्मास हा धार्मिक प्रकार असला तरी सामाजिक, आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तो अत्यंत उपकारक आहे.