मुंबई (प्रतिनिधी) : न्यूमोनिया या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांस उपक्रम अंतर्गत न्यूमोनियापासून बचाव, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने १२ नोव्हेंबर ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सांस उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे प्रमुख ध्येय सन २०२५ पर्यंत भारतात बालकांमधील न्युमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमध्ये ३ पेक्षा कमी करणे हे आहे.

दरम्यान सांस या उपक्रमाचे उद्दिष्ट हे बालकांमधील न्युमोनियापासून प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे, न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना, काळजी वाहकांना सक्षम बनविणे. न्युमोनिया आजारास गंभीरपणे घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार, काळजी घेण्यासाठी न्यूमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करून पालकांची, काळजी वाहकांच्या वर्तणुकीत बदल करणे, पीसीव्ही या लसीबाबत जनजागृती करणे हे आहे. खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे ही न्युमोनियाची प्रमुख लक्षणे आहेत.

तसेच या उपक्रमाअंतर्गत वस्ती पातळीवर भर दिला जाणार असून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांद्वारे गृहभेटी देऊन आजारी बालकांचा शोध घेऊन, बालकांमध्ये न्युमोनियाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना उपचाराकरीता नजीकची दवाखाने, रुग्णालये येथे संदर्भित करून उपचार करण्यात येईल. तसेच जास्तीत-जास्त बालकांना पीसीव्ही (न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन) देण्यास प्रवृत्त करून बालकामध्ये न्युमोनियाचा आजार होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, वस्ती पातळीवरून संदर्भित करण्यात येणाऱ्या गंभीर आजारी बालकांस, न्युमोनियाची लक्षणे आढळून आल्यास सदर बालकांना उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल व तसेच आवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल. या उपक्रमात महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसुतिगृह, उपनगरीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे येणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील बालकांना तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल.

खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे इत्यादी लक्षणे लहान बालकांत आढळून आल्यास पालकांनी अधिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्र, दवाखाना, प्रसुतिगृह व रुग्णालय येथे संपर्क साधावा. – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here