धर्म ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने मोहात अडकलेल्या अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. भगवद्तगीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भलेही संदर्भ बदलले असतील; परंतु अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत तसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे. येथे जाणून घ्या, गीतेमधील काही खास श्लोक आणि त्याचे अर्थ.

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

अर्थ – श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात, सामान्य पुरुषही तसेच आचरण करू लागतात. श्रेष्ठ व्यक्ती जसे कर्म करतो, तोच आदर्श घेऊन लोक त्याचे अनुकरण करतात.

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:।
काम: क्रोधस्तथा लोभस्तरमादेतत्त्रयं त्यजेत्।

अर्थ – काम, क्रोध आणि लोभ. हे तीन प्रकारचे नरकाचे द्वार आत्म्याचा नाश करणारे आहेत, म्हणजेच अधोगती करणारे आहेत. यामुळे या तिघांचा त्याग करावा.

मॅनेजमेंट सूत्र – काम म्हणजे इच्छा, क्रोध आणि लोभ सर्व वाईटाचे मूळ कारण आहे. यामुळे भगवान श्रीकृष्णाने या गोष्टींना नरकाचे द्वार म्हटले आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे ३ अवगुण असतात, तो नेहमी इतरांना दु:ख देऊन आपला स्वार्थ साध्य करतो. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा असेल, तर हे ३ अवगुण दूर करावेत. कारण, जोपर्यंत हे अवगुण आपल्या मनात आहेत, तोपर्यंत आपले मन लक्ष्यापासून भटकत राहते.

योगस्थ: कुरू कर्माणि संग त्यक्तवा धनंजय।
सिद्धय-सिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

अर्थ – हे धनंजय (अर्जुन), कर्म न करण्याच्या आग्रहाचा त्याग करून, यश-अपयशाच्या विषयी समबुद्धी, योगयुक्त होऊन कर्म कर, कारण समत्वालाच योग म्हणतात.

मॅनेजमेंट सूत्र – धर्माचा अर्थ आहे कर्तव्य. धर्माच्या नावावर आपण अनेकवेळा केवळ कर्मकांड, पूजापाठ, तीर्थ-मंदिपर्यंत सीमित राहतो. आपल्या ग्रंथांनी कर्तव्यालाच धर्म मानले आहे. भगवान सांगतात की, आपले कर्तव्य पूर्ण करताना कधीकधी यश-अपयश आणि नुकसान-फायद्याचा विचार करू नये. बुद्धी केवळ आपले कर्तव्य म्हणजे धर्मासाठी वापरून काम करावे.

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना।
न चाभावयत: शांतिरशांतस्य कुत: सुखम्।

अर्थ – योगरहित व्यक्तीमध्ये निश्चय करण्याची बुद्धी नसते आणि त्याच्या मनात भावनाही नसते. अशा भावनारहित व्यक्तीला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कोठून मिळणार.

मॅनेजमेंट सूत्र – प्रत्येक मनुष्याला सुख प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो भटकत राहतो; परंतु सुखाचे मूळ त्याच्या मनातच स्थित असते. ज्या मनुष्याचे मन इंद्रीय म्हणजे धन, वासना, आळस यामध्ये लुप्त असतात त्याच्या मनात भावना (आत्मज्ञान) नसते आणि ज्या व्यक्तीच्या मनात भावना नसते, त्याला कोणत्याही प्रकारे शांती मिळत नाही आणि ज्याच्या मनात शांती नाही, त्याला सुख कसे मिळणार. यामुळे सुख प्राप्त करण्यासाठी मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.