आराधना गोखले-जोशी

अलीकडेच एका करमणूक प्रधान वाहिनीवरील नृत्यविषयक कार्यक्रम बघण्याचा योग आला. कंटेम्पररी फॉर्ममध्ये आपला नृत्याविष्कार दाखवणा-या त्या मुलीची परीक्षकांनी निवड केली. मात्र तिच्यासोबत कोणीच पालक नसल्याने परीक्षकांनी विचारणा केली असता घरच्यांना आपण नाचतो ते आवडत नाही, शिवाय आज मी इथे आले आहे, हे सुद्धा त्यांना माहिती नसल्याचं तिने सांगितलं. यावर परीक्षकांनी तिच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधला. सुरुवातीला परीक्षकांशी अदबीनं बोलणा-या त्या वडिलांना जसं समजलं की, आपली मुलगी त्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे, तसं त्यांनी फोनवरच आपल्या घराण्याला तुझ्यामुळे कसा कलंक लागला आहे, असं सुनवत आपली तीव्र नाराजी आणि विरोध व्यक्त केला.

त्याच कार्यक्रमात पुण्याच्या एका स्पर्धकाच्या आई-वडिलांनी मात्र आपल्याला दोन्ही मुली असल्याचं अभिमानाने सांगितलं आणि त्यांच्यामुळेच आपल्याला समाजात सन्मान कसा मिळत आला आहे, याचा आनंदही व्यक्त केला. एका मुलाने बॅली डान्सचा प्रकार सादर करून उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला, मात्र त्यानेही असा डान्स फॉर्म आपण सादर करतो त्यावरून समाजाकडून आपल्याला कशी वागणूक मिळते ते नमूद केलं. त्यावर एका परीक्षकाने हे काम स्त्रीचं आणि ते काम पुरुषाचं अशी विभागणी आजही कशी आपल्या समाजात दिसून येते, यावर खूप छान भाष्य केलं होतं.

विशेष म्हणजे आपण नुकताच जागतिक महिला दिन साजरा केला. या तीन प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर असा दिवस साजरा करून आपण नेमकं काय साधतो, हा प्रश्न मला तरी अस्वस्थ करणारा आहे. अनेकदा मजेनं असंही म्हटलं जातं की ८ मार्चपासून महिला दिन सुरू होतो तो पुढील वर्षी ७ मार्चला संपतो. पण खरंच असं आहे का? स्त्रीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? नोकरी करणा-या स्त्रीला (काही अपवाद वगळता) आपल्या पगारावर हक्क सांगता येतो? आर्थिक गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची याचे निर्णय अनेकदा नवराच घेताना दिसतो; ‘ते तुला काय त्यातलं कळणार आहे,’ अशी टिप्पणी करत!

मागच्याच आठवडय़ात आमच्या बीएमएमच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वाणगावच्या दोन आदिवासी पाडय़ांना भेट देऊन तिथे सॅनिटरी पॅडबाबत जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. एका ठिकाणी त्यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर दुसरीकडचा अनुभव त्यांचा उत्साह खच्ची करणारा होता. ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम करणार आहोत, त्या महिला घराच्या बाहेरच पडत नाहीत, डोकावून बघत नाहीत, आपल्याच आरोग्याबाबत त्यांना काहीच देणं-घेणं कसं नाही, हा विचार या सगळ्याच विद्यार्थ्यांना अस्वस्थ करणारा आहे. ‘भारत आणि इंडिया’ यातला फरक तिथे प्रकर्षाने जाणवला, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मध्यंतरी एकदा खरेदीच्या निमित्ताने दुकानात गेले होते. तिथे एक महिला नाईट गाऊन घ्यायला आली होती. दोन-तीन गाऊन पसंत केल्यावर तिने ते खरेदी करण्याअगोदर ‘नव-याला दाखवते, त्याला आवडले तर घेते’ असं दुकानदाराला सांगितलं आणि मनात प्रश्न आला की, एखादीला आपल्या आवडीप्रमाणे काय घालायचं याचंही स्वातंत्र्य नसावं का? त्या कपडय़ाचे पैसे नवरा देणार म्हणून त्याच्या आवडीप्रमाणेच खरेदी करावी का?

नवरा- बायको दोघेही नोकरी करणारे असतील, तर साहजिकच घरातल्या कामांची विभागणी आपोआप केली जाते. ती खरंतर त्या दोघांची सोय असते आणि तो त्यांचा निर्णय असतो. मात्र त्यावर ‘आमच्या मुलाला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि तू इथे त्याला कामाला जुंपलं’ असं जेव्हा सासू गरोदर सुनेला ऐकवते, तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न सुनेलाही पडतो, कारण लग्नाअगोदर ती मुलगी म्हणून आपल्या माहेरी सुखात नांदलेली असते, कामाचा ढीग उपसण्याची तिलाही सवय नसते. पण तरीही ती तिच्या परीने लग्नानंतर बदललेल्या परिस्थितीला सामोरी जात असते. अशावेळी तिला गरज असते ती पाठिंब्याची, आधाराची आणि तो आधार तिने आपल्या जोडीदारात शोधला तर तिचं तरी काय चुकलेलं असतं?
संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार जगात दर तीन स्त्रियांमागे एक स्त्री मारहाण, हिंसाचार याला आयुष्यात कधीना कधी बळी पडलेली असते. ३० टक्के स्त्रियांना घरगुती हिंसाचार, मानसिक छळाला तोंड द्यावं लागतं आणि हा छळ मुख्यत्वेकरून जोडीदाराकडूनच होतो. तक्रार दाखल करण्यात आलेल्या रिपोर्टवरून काढलेली ही आकडेवारी आहे. ती यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते, असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित देशांमध्येही परिस्थिती फारशी बरी नाही. तिथेही महिलांना समान संधी, समान मोबदला यासाठी आंदोलनं करावी लागतायत.

अर्थार्जन करणा-या महिलांच्या संख्येत गेल्या काही वर्षापासून कमालीची वाढ होत आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचं अस्तित्व जाणवू लागलं आहे. महिला नोकरदार जशा वाढत आहेत तशाच महिला उद्योजकही वाढत आहेत. स्टार्टअप इंडियामुळे अनेक नवउद्योजक तयार झाले आहेत. मात्र त्यातही महिलांची संख्या नगण्य आहे.

आपल्याला डावललं जातयं, आपल्यावर अन्याय होतोय, त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा याची जाणीव होणं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ समजायला लागणं आणि ही जाणीव हेच समानतेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणता येईल. प्रत्येक स्त्रीला जर हे उमगलं तर यंदाच्या जागतिक महिला दिनाची मध्यवर्ती कल्पना इच फॉर इक्वल सत्यात उतरायला सुरुवात होईल!