बाबा स्वतः कधी उपाशी राहत नसत आणि कोणालाही उपाशी राहू देत नसत. ते म्हणायचे ‘जो उपाशी उसतो त्याचे चित्त थाऱ्यावर नसते, मग त्याचे देवाकडे लक्ष कसे लागणार? दुपारच्या वेळी भुकेसरशी दोन घास पोटात गेले नाही, तर सगळी इंद्रिये हीनदीन होतात. त्या वेळी देवदर्शन, कीर्तन, श्रवण, मनन यापैकी कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. म्हणूनच आधी आत्म्याला संतुष्ट करा आणि मगच परमार्थ करा. भुकेल्यापोटी देव सापडला, असे आजवर घडले नाही आणि पुढेही घडणार नाही आणि म्हणूनच बाबांना उपासतापासाचे कोडकौतुक चालत नसे.

एके दिवशी गोखले नावाच्या एक बाई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्या दर्शनासाठी मशिदीत आल्या तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘बाई, अन्न आणि अन्न खाणारा दोघेही विष्णुरूपच असतात. मग उपासतापास करायचे, निराहार राहायचे, पाणी न पिता राहायचे हे उपद्व्याप कशाला? तेव्हा उपासाची वार्ता टाकून दादा केळकरांच्या घरी जाऊन पुरणाच्या पोळ्या कर. त्या त्यांच्या घरातील मंडळीना खाऊ घाल आणि तू स्वतःही खा.’ बाबांचे ते बोल ऐकून गोखले बाईंची उपासाची मनीषा कुठल्याकुठे गेली. बाबांना वंदन करून त्या तत्काळ केळकरांच्या घरी गेल्या.

योगायोगाने त्या दिवशी शिमगा होता आणि केळकरांचे कुटुंबही अस्पर्श होऊन बसले होते. म्हणून गोखले बाईंनीच सर्व स्वयंपाक केला आणि सर्वांना पोटभर पुरणपोळ्या खाऊ घातल्या. साई सांगत आधी पोटोबा नंतर विठोबा. हृदयाचा मार्ग पोटातून जातो. म्हणून साई अनेक गरिबांना भंडारा वाटत. मगच त्यांना अध्यात्म शिकवत.

-विलास खानोलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here