पर्शियन भूमीतला गंजिफा हा खेळ (Ganjifa Game) सोळाव्या शतकामध्ये भारतीय उपखंडामध्ये लोकप्रिय झाला. विविध चित्र हातांनी रंगवलेल्या पत्त्यांचा हा खेळ मुघल काळामध्ये सुफी संतांसोबत आल्याचेही काही अभ्यासक नोंदवतात.

आशिया खंडातल्या पश्चिम, मध्य आणि दक्षिण भागांमध्ये या खेळांचे वैविध्य पाहायला मिळते. पर्शियन भाषेतील “गंज” या शब्दापासून “गंजिफा” शब्द तयार झाला. ‘गंजफा’, ‘गंजिफा’ किंवा ‘गंजपा’ असंही त्याचं उच्चारण केलं जातं. ‘गंज’ या शब्दाचा मूळ पर्शियन अर्थ ‘खजिना’ किंवा ‘पैसा.’ विसाव्या शतकामध्ये इराणमधून हा खेळ खेळणे बंद झाल्यानंतर आता केवळ भारतामध्ये या खेळाचे अस्तित्व टिकून राहिलेले आहे.

महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणात त्यातही सावंतवाडीमध्ये आणि त्याशिवाय बंगाल, जयपूर, ओडिशा राज्यांमध्ये या खेळाचा आढळ होतो. गोल पत्त्यांची परंपरा बंगालमधील सगळ्यात प्राचीन असल्याचा अभ्यासकांचा होरा आहे. पंधराव्या शतकातील ममलुक सुलतान हा कंजिफा खेळत असल्याचे परदेशी इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. अरब प्रांतात मध्ययुगामध्ये त्या पत्त्यांना ‘कंजिफा’ म्हणत असत. बाबर भारतात आला, त्या सुमारास म्हणजेच इसवी सन १५२७ मध्ये हा खेळही मुघलांसोबतच भारतात आल्याचे समजते. “हुमायूननामा” या सोळाव्या शतकात गुलबदन बेगम यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्येही गंजिफाच्या खेळाचे मूळ स्वरूप काय होते, त्याविषयी सविस्तरपणे लिहिलेले आहे. “चंगकांचन” असे मुघलकालीन त्याचे नाव आहे. तत्कालिन सतारीला ‘चंग’ म्हणत, तर ‘कांचन’ म्हणजे सोने; परंतु गंजिफा खेळाला ‘चंगकांचन’ संबोधण्यामागील कारण स्पष्ट होत नाही. मुघलकालीन गंजिफावर कुराणातील संदर्भ रेखलेले असत. अध्यात्म, श्रद्धा, धार्मिक गोष्टींचे ज्ञान व्हावे, हा हेतू तेव्हापासूनच या खेळामागे असल्याचं दिसून येईल. त्या खेळाचे मूळ रूप प्रदेश आणि संस्कृतीनुसार बदलत गेले. भारतात आल्यानंतर पत्त्यांवरील मुघलांच्या कुराणाची जागा हिंदू प्रतिमांनी घेतली. इथल्या तत्कालिन सांस्कृतिकतेचा पगडा लक्षात घेता, असे घडणे स्वाभाविक होते. खेळांचा संदर्भ अगदी महाभारत काळापासून पाहिला, तर असं लक्षात येतं की, राजसूयासारखे दिग्विजयी यज्ञ करून परतल्यानंतर राजेरजवाडे मनोरंजनाच्या हेतूने द्युतासारखे खेळ खेळत असत. महाभारताच्या सभापर्वामधील द्युतपर्वात हस्तिनापूर येथे कौरव पांडवांमध्ये रंगलेल्या द्युतामध्ये जिंकलेले सर्व काही हरलेला धर्मराज युधिष्ठिर आपल्या अन्य चार भावंडांसोबत आणि द्रौपदीसह तेरा वर्षांच्या वनवासाला गेल्याचे कथानक येते. पैशांची किंवा वस्तूंची देवाण-घेवाण करणं हा या खेळाचा एक भाग आहे, हे देखील इथे लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात, अशा प्रकारचे मनोरंजनाचे खेळ हे एक प्रकारे पैसे लावून खेळण्याचे, जुगाराचे खेळ म्हणूनही प्राचीन काळापासून प्रचलित होते.

ऐन – ए – अकबरी, काबुन – ए – इस्लाम, गिरधरकृत गंजीफालेखन इत्यादी ग्रंथांतून गंजिफा खेळाची माहिती मिळते. मुघल दरबारी वापरले जाणारे पत्ते हस्तिदंत आणि कासव्याच्या पाठीवरील कवचाचे बनवले जात असत. सामान्यांचे गंजिफा पत्ते हे कापड स्टार्च करून तर कधी ताडाच्या पानांचे, लाखेचे तयार केले जात. त्या त्या काळातल्या लोकांमधील खेळाविषयीची आवड, लोकप्रियता यानुसारही गंजिफाच्या पत्त्यांमध्ये बदल झालेले आहेत. मूळच्या आयताकृती पत्त्यांचे भारतीय स्वरूप वर्तुळाकार झाले. त्या लहान गोलाकार पत्त्यांमध्ये लघुचित्रशैलीत चितारलेल्या हिंदू प्रतिमा, खासकरून दशावतार विशेष प्रचलित आहेत.

दक्षिण कोकणातील खासकरून सावंतवाडी येथील गंजिफा या पत्त्याच्या खेळाची परंपरा तीनशे वर्षांहून अधिक आहे. विद्येला, कलेला राजाश्रय असल्याच्या काळामध्ये विविध प्रांतातील विद्वान आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी, स्पर्धात्मक वादविवाद चर्चांसाठी वेगवेगळ्या राजांच्या दरबारी जात असत. असेच काही ब्रह्मवृंद आंध्र, तेलंगणा भागातून धर्मचर्चेसाठी सतराव्या, अठराव्या शतकामध्ये सावंतवाडीच्या खेम सावंतांच्या दरबारी दाखल झाले. त्यावेळी राजांनी या ब्रह्मवृंदासोबत आलेली लाखेची कला पाहिली आणि त्या कलेला कोकणभूमीत रुजवण्यासाठी तिला राजाश्रय दिला. खेम सावंतांच्या काळात या खेळाच्या निर्मितीला चालना मिळाली आणि “दरबार कलम” नावाने देवदेवतांची चित्रं गोलाकार पत्त्यावर आणि त्याभोवतीने वेलबुट्टीची नक्षी, असे संच निर्माण होऊ लागले. फक्त रंगीबेरंगी पट्टे असले, तर त्यांना “बाजार कलम” म्हटलं जाई. पूर्वी लढाईनंतर होणाऱ्या तहाच्या वेळी भेट म्हणूनही गंजिफा संच देण्याची पद्धत होती. १९३० मध्ये पंचम खेमराजांनी गोव्याच्या भूमितून चितारी – चित्रकारांना सावंतवाडीच्या चित्रशाळेत आणून त्यांना प्रशिक्षित करून या कलेला चालना दिली, तर लयाला जाऊ लागलेल्या या कलेला पुन्हा १९५९ मध्ये ऊर्जितावस्था देण्याचे काम सावंतवाडीच्या राजघराण्यानेच केले.

गंजिफाच्या गोलाकार पत्त्यांवर विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते कल्की अवतारापर्यंतचे मुख्य अंकन नैसर्गिक रंगांतून, लघुचित्रशैलीत करण्यात आले. प्रत्येक अवतार म्हणजे राजा किंवा (अ)मीर झाला. त्यानंतर वजीर म्हणजे राजाचा घोडेस्वार सर्वात महत्त्वाचा ठरत एक्का ते दश्शा अशी बारा पाने प्रत्येक अवतारासोबत असून त्याचा एक संच, असे १२० पत्ते एकूण असतात. प्रत्येक अवतारातील अमिराचा पत्ता सगळ्यात श्रेष्ठ, तर एक्क्याला सर्वात खालचे स्थान असते. तीन खेळाडूंमध्ये खेळल्या जाणाऱ्या गंजिफामध्ये प्रत्येक खेळाडूला ४० पाने वाटली जातात. खेळण्यापूर्वी पांढराशुभ्र कपडा पसरून, मगच त्यावर खेळाडू बसतात आणि खेळाला सुरुवात करतात. दिवसा राम आणि रात्री कृष्ण हाती येणाऱ्याकडे खेळाचे पहिले राज्य जाते. अर्थात तो खेळाडू डावाला सुरुवात करतो. अशा खेळाडूला सुकऱ्या असा शब्द कोकणात प्रसिद्ध आहे. याशिवाय उतारी करून घेणे, तिगस्त (तिघांनी एकत्र येणं), हर्दू (हरणे) आणि उत्तर सर (खेळाचा उत्तरार्ध), आखरी मारणे (डाव आपल्या बाजूने फिरवणे) असेही शब्दप्रयोग गंजिफा खेळाच्या निमित्ताने वापरले जातात. ज्याची स्मरणशक्ती अधिक त्याची या खेळात सरशी ठरलेली असे, तर नवग्रह गंजिफा नामस्मरणाच्या हेतूने खेळला जात असल्याकारणाने तो संच अमंगल जागी ठेवू नये, ही धारणा पुन्हा स्थानिक श्रद्धासंस्कृती, रीती-परंपरांशी जोडलेली आपल्याला दिसून येईल. कोकणातल्या विविध गावांतून होणाऱ्या जत्रोत्सवांदरम्यान जुगार खेळला जात असे. काटा, गडगडा अशा उघड जुगारांबरोबरच घरांतूनही पत्त्यांचा जुगार चाले, असा संदर्भ सापडतो. शिवाय भारतामध्ये दिवाळीच्या दिवसात खासकरून पत्त्यांचा डाव टाकणे, पत्ते खेळणे ही परंपरादेखील पाहायला मिळते. या सगळ्याचा धागा प्राचीनतम द्युतापासून, गंजिफा खेळापर्यंत आणून जोडता येऊ शकतो.

माणसाने जीवनावश्यक गोष्टींबरोबरच मानसिक समाधानासाठी, विरंगुळ्यासाठी विविध कलांची निर्मिती केली. त्या त्या टप्प्यांवर निर्माण झालेल्या कला, क्रीडा यांचे प्राचीन रूप कालौघात बदलत गेले असले तरीदेखील त्यामागील मूळ जाणिवा कायम राहिल्या. गंजिफासारखे खेळ परदेशी संस्कृतींच्या रूपाने इथे आले आणि इथलेच होऊन गेले.

-अनुराधा परब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here