मृणालिनी कुलकर्णी
परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मनात करिअरसंबंधी विचार सुरू होतात. व्यवसाय करिअरची व्याप्ती मोठी आहे. आजचे विस्तारलेले तंत्रज्ञान, संगणकयुग, कला, क्रीडाक्षेत्र, पर्यटन, फॅशन… कोणतेही क्षेत्र, व्यवसाय करिअर म्हणून निवडताना प्रथम स्वतःची आवड आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीत झालेले बदल ओळखा.
हिस्सार या हरियाणातील छोट्या खेड्यातील १७ वर्षीय युवकाला, वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे शिक्षण सोडावे लागले. त्यांचा एक्सेल ग्रुप आणि वीसपेक्षा अधिक उद्योग त्यांनी उभे केले ते माध्यम सम्राट सुभाषचंद्र गोयल! एकेकाळी मराठी माणसाचे क्षेत्र नसलेल्या क्षेत्रात पाय रोवून सराफीच्या व्यवसायात विश्वसनियतीचे प्रतीक असलेले दाजीकाका गाडगीळ. शेतीची अवजारे, पंपापासून सुरुवात करणारे लक्ष्मण किर्लोस्कर, इडली ते ऑर्किड हॉटेल व्यवसायाची साखळी निर्माण करणारे विठ्ठल कामत, नेपथ्यकार (सेट) नितीन देसाई अशी अनेक व्यक्तिमत्त्व त्यांच्या नावाशी व्यवसाय जोडले गेलेले आहेत. सगळेच त्या उंचीपर्यंत जातात असे नाही. प्रत्येकाचे अवकाश वेगळे असते..
आज सर्वच व्यवसाय शाखा सन्मानित झाल्या आहेत. कलाकारांना समाजात पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. हॉटेल व्यवसायात शेफ ही उपाधीही सन्मानाने संबोधली जाते. फोटोग्राफी, मॉडेलिंग, जाहिरात, पत्रकारिता, त्यांच्या लघू शाखाही विकसित झाल्या आहेत. घरगुती समारंभापासून ते मोठमोठ्या इव्हेन्टमध्ये प्रत्येक टप्प्यावर कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. मागणी वाढत असल्याने प्रत्येक प्रश्न, प्रत्येक गरज व्यवसाय बनत आहे. बदलाचा वेग वाढतच जाणार आहे. तरीही अजूनही बऱ्याच घरात पालकांचे पाल्याविषयीचे विचार बदलले नाहीत हेच वैषम्य आहे. लोक काय म्हणतील, यापेक्षा आपला मुलगा काय करू पाहतो ते ऐका, प्रोत्साहन द्या. मुलांच्या कल्पनांना, आकांक्षाना खतपाणी न घालता खोट्या प्रतिष्ठेपायी मुलाला परावृत्त केले जाते. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारे बिनकष्टाचे करिअर हवे. मग सगळे एकाच क्षेत्रात गर्दी करतात. युवकांनो, स्पेशलायझेशनच्या युगात कामाची लाज वाटता कामा नये. स्वतःच्या व्यवसायासंबंधीचे वाचन हवे. आपल्या क्षेत्राचा इतिहास, नावाजलेल्यांचे कार्य माहीत हवे. इंग्रजी भाषा सुधारा. आज देशात, देशाबाहेर काय चाललंय याकडेही लक्ष हवे. मुख्यतः भविष्यात कशाची गरज लागेल हे ओळखा. अँप्टिट्यूड टेस्टपेक्षा स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा. एका मुलीला तू ब्युटीपार्लर किंवा टेलरिंगचा कोर्स केलेला बरा, तुला अधिक काही झेपणार नाही. ती बायो टेक्नॉलॉजित एमएस्सीला कॉलेजात दुसरी आली.
व्यवसाय सम्राटानंतर कला-क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग करिअर :
‘क्रिकेट हाही एक अभ्यास आहे. शाळेतील पुस्तक म्हणजेच फक्त अभ्यास नव्हे’. अजित तेंडुलकरने सचिनविषयी बोलताना हे सांगितले. हा विचाराचा दृष्टिकोन, घरातील सर्वांचा पाठिंबा, त्याच्याकडे असलेले अंगभूत क्रिकेट आणि मेहनत यामुळेच भारताला ‘सचिन रमेश तेंडुलकर’ लाभला.
स्पर्धा असल्याने प्रत्येक क्षेत्रात दर दिवशी नावीन्य हवे, वेगळेपणा हवा, कल्पकता हवी. स्वतःच एक टच हवा, सहावीत नापास झाल्यावर परिस्थितीमुळे मधुर भांडारकर पुढे जे काही शिकले ते वाचून, पाहून, ऐकून, निरीक्षणातून चरित्रात्मक वाचन भरपूर केले. शेकडो डीव्हीडी पहिल्या. व्हीडिओ कॅसेट घरोघरी पोहोचवायच्या कामात, परिचयातून सिनेसृष्टीत आले. अपयश खूप पचविले. जवळ ना शिक्षण, ना डोक्यावर कुणा गॉडफादरचा हात. ट्रेण्डपेक्षा वेगळे सिनेमे देऊन (चांदनी बार, ट्रॅफिक सिग्नल,पेज थ्री…) बॉलिवूडमध्ये मधुर भांडारकर या मराठी नावाची खणखणीत मोहर उमटवली.
मराठी मध्यमवर्गात वाढलेल्या अमृता पत्कीचा अनुभव : माझ्या आई-वडिलांनी स्वतःची हौस कमी करून आम्हा दोघा बहिणीचे नटण्याचे लाड पुरविले. कला-गुणाला वाव देण्यासाठी गाणं, नाच, अभिनय यांच्या शिबिराला पाठविले. वयाच्या २१ वर्षांपर्यंत मराठी माध्यमात वावरलेली, लिंक रोडवरचे १०० रुपयांचे टी शर्ट घालणारी मी ‘अमृता पत्की’ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाने ८४ देशांतून भारताला रिप्रेझेन्ट केले आणि “मिस अर्थ २००६ जिंकले.”
रोजच्या जीवनात, नव्याने बदल झालेले, वेळ-श्रम वाचविणारे, बहुउद्देशीय उत्पादनं, बाजारात सातत्याने येत असतात. वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या कल्पनांना, स्वतःच्या छोट्या व्यवसायाला, मार्केटिंगसाठी दरवर्षीच्या व्यापारी ग्राहकपेठ, विविध प्रदर्शनातून वाव मिळतो. गावाकडील घरगुती खाण्याचे पदार्थ, टाकाऊतून कलाकुसर, महिलांनी शिवलेल्या कापडाच्या पर्स, पिशव्या, ड्रेस, दागिने असे अनेक स्टॉल असतात. प्रत्येकाचा खरेदीमागचा विचार वेगळा. व्यवसायात करिअर करताना खोटी प्रतिष्ठा नको.
आज रोजचे घरचे जेवण ही काळाची खूप मोठी गरज आहे. सणावारी, पार्टीला याला प्रचंड मागणी आहे. केरळच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या पी. एस. मुस्तफा सहावी नापास झाला. नंतर तो इंजिनीअर झाला, विदेशात त्याचे मन रमेना. भारतात परत आल्यावर आयडी या नावाने डोशाचे पीठ तयार केले, ते आज बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे.
दूरदर्शनवर करोडपतीमध्ये मुंबईतील चांगली नोकरी सोडून घरची शेती नसताना, शेतीसाठी जमीन विकत घेऊन मी शेती करणार आहे. त्याचे कौतुक यासाठी त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारात स्पष्टता होती. हे व्यवसाय करिअरसाठी खूप आवश्यक असते.
पंचवीस-तीस वर्षांची ही तरुण मुले, आकाशात उडण्याचे, फुलण्याचे, त्यांचे वय. त्याचबरोबरीने मध्यमवयीन महिलाही स्वतःच स्वप्ने पुरी करण्यासाठी धडपडत आहेत. ज्या कामाने समाधान मिळते, त्याहीपेक्षा स्वतःच्या कौशल्याला वाव मिळतो ते काम स्वीकारावे, तेच व्यवसाय करिअर होय. आज स्टार्टअपमुळे युवकांच्या व्यवसायाला चालना मिळाली. प्रत्येक क्षेत्राला करिअर आहे. कष्ट करून पुढे जात असलेल्या मुलांचे यश प्रतिष्ठेपेक्षा मोठे असते. समाजाला सर्वच क्षेत्रात उत्तम काम करणारे, कुशल कामगार, अधिकारी, तंत्रज्ञ, आणि लेखक-कलाकार हवे आहेत. ज्या उंचीपर्यंत युवक जातो त्याचा अभिमान बाळगा, कौतुक करा. लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. कामानेच कामाला प्रतिष्ठा प्राप्त होते. माझ्या शुभेच्छा !