Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीयुवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

पंचवटीतील उड्डाण पुलावरील मध्यरात्रीची घटना

मतमोजणीसाठी नाशिकमध्ये येत असतानाच झाला अपघात, सत्यजित तांबेंचे जवळचे सहकारी

पंचवटी : आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मानस पगार आपल्या काही सहकाऱ्यांसह नाशिकमध्ये येत असतानाच नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (३२)यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मानस पगार यांचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.

मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पगार हे सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मानस पगार यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त समजताच राज्य व देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.

आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकालही लागणार आहे. त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ट्विटमध्ये सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.

आज मुळगावी अंत्यसंस्कार

अचानक झालेल्या अपघातामुळे पगार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -