Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईकरांना मिळणार दिवाळी गिफ्ट!

मुंबईकरांना मिळणार दिवाळी गिफ्ट!

समुद्र किनाऱ्यावरून सलग ७ किमी चालत जाता येणार

मुंबई : मुंबईत होणाऱ्या कोस्टल रोडमुळे वरळी सी फेस, मरीन ड्राइव्ह तसेच हाजीअली येथील समुद्र किनारा नजरेआड झाल्याची तक्रार मुंबईत येणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात येत आहे. कोस्टल रोडसाठी उभारण्यात आलेल्या मोठमोठ्या पत्र्याच्या बॅरिकेड्सआड मुंबईचे सौंदर्य गडप झाल्याचे चित्र सध्या जरी असले तरी ते लवकरच हे रुपडे पालटणार आहे. वरळीपासून ते थेट मलबार हिलपर्यंत सुमारे सात किलोमीटर लांबीचा नवा सी फेस मुंबईकरांना लाभणार आहे. यामुळे धावपटू, सायकलपटू तसेच मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना या ७ किमीच्या पट्ट्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत १०.५८ किमीचा हा कोस्टल रोड साकारत आहे. त्याला जोड मिळणार आहे ती जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पर्यटन उद्याने यांची. किनाऱ्यांवर बसण्यासाठी विशेष बैठक व्यवस्थाही उभारण्यात येणार आहे. याचे कामही जोरात सुरू असून सध्या वरळी सी फेसपासून साधारण १०० मीटर लांबीवर नवीन सी फेसच्या कामालाही वेग आला आहे. थेट समुद्राच्या कुशीत असलेला हा सी फेस येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून फेरफटका मारत अगदी चालत महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, प्रियदर्शनी पार्क यांना भेट देत थेट मलबार हिलपर्यंत जाणे शक्य होईल.

या कोस्टल रोडचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंते मंतय्या स्वामी यांनी दिली. काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. मात्र अंतर्गत सोयीसुविधा उभारण्यास आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्यांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. एका बाजूचा बोगदा पूर्ण झाला असून दुसऱ्या बाजूकडील बोगद्याचे केवळ १०० मीटरचे काम राहिले आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल. या बोगद्यांमध्ये अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणालीही बसविण्यात आली असून अग्निशमन यंत्रणाही उभारण्यात आली आहे. अग्निशमनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बसविण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -