Sunday, May 19, 2024
Homeअध्यात्ममनाने देवाची उपासना

मनाने देवाची उपासना

जीवनविद्या सांगते देवाची भक्ती करण्यासाठी काही लागत नाही. आपले मन व शरीर एवढे पुरे. मन व शरीर या दोन गोष्टी आपल्याकडे असल्या की, बाकी काही नको. मनाने देवाची उपासना करू शकतो. त्यासाठी कुठे जायला नको व कुठे यायला नको. सांगायचा मुद्दा असा परमेश्वराबद्दलचे स्मरण हीच गोष्ट आपल्याला ज्ञात नाही. हे माहित नसेल, तर तुम्ही भक्ती काय करणार? उपासना काय करणार? आराधना काय करणार? आज देवाबद्दलचे अज्ञान इतके आहे की, देवाची गरजच काय? असे म्हणणारे लोक आहेत. देवाशिवाय सर्व काही चाललेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. देव आहे म्हणून सर्व चाललेले आहे. लोकसुद्धा म्हणतात, देवावाचून काय अडले आहे? देवाशिवाय सर्व चाललेले आहे. पण त्यांना हे कळत नाही की देवाचे अस्तित्व नसेल, तर सर्व थंड होईल. “चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलवितो हरिविण”. आपण श्वासोच्छवास चाललेला आहे, आपण बोलतो, विचार येतात जातात, आपले सगळे व्यवहार चालतात पण कुणाच्या जीवावर? तो दिसत नाही म्हणून त्याच्या अस्तित्वाची कल्पना आपल्याला येत नाही. पण परमेश्वराचे केवळ अस्तित्व हे जग चालण्यास कारणीभूत आहे, ही गोष्ट आपल्या ध्यानात आली नाही, तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. मी एक उदाहरण देतो. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सर्व चाललेले आहे. फ्रीज चाललेला आहे, मिक्सर चाललेला आहे, ऑपरेशन थिएटर चाललेले आहे. वीज नाही तर ऑपरेशन बंद. वीज नाही तर सर्व कामे बंद आणि वीज आहे तर सर्व कामे चाललेली असतात. वीजेचे अस्तित्व त्याला कारणीभूत आहे. वीज स्वतः काही करते का? ती काही करत नाही. ती आहे म्हणून सर्व चाललेले आहे. ‘तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्तेने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणूनी रण आलो’ हे वर्म ज्यांनी जाणले ते देवाला रण जातात. हे सर्व चाललेले आहे ते केवळ देवाच्या अस्तित्वावर! हवेचे केवळ अस्तित्व आहे म्हणून आपण सर्व व्यवहार करतो. हवा नाही तर सर्व व्यवहार बंद होतील. वीज नसेल, तर एकवेळ चालेल. पूर्वी कुठे वीज होती पण चालले होते ना. पण हवा नसेल, तर क्षणभरसुद्धा चालणार नाही. माणसे कासावीस होतात. हवा काय करते? पण केवळ हवेचे अस्तित्व तुम्हाला सर्व कार्य करण्यास आधारभूत असतो, तसेच देवाचे आहे.

– सदगुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -