Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखवर्ल्ड फूड इंडिया २०२३ आणि त्यापुढील क्षितिजे

वर्ल्ड फूड इंडिया २०२३ आणि त्यापुढील क्षितिजे

अनिता प्रवीण: सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग

भारताची २१ व्या शतकातील वाटचाल अतिशय उल्लेखनीय राहिली आहे. एक देश म्हणून  आपली विकासगाथा ही शाश्वत प्रगती, तंत्रज्ञान, शाश्वततेबाबतची वचनबद्धता, बड्या उद्योगांची प्रतिरोधक क्षमता आणि जागतिक पातळीवरील आपली प्रतिमा यांसारख्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारी आहे. दर दिवसागणिक भारताचे परिवर्तन घडवून आणणारे आपले उद्योग आणि त्यांच्याशी संबंधित असलेली इतर अनेक क्षेत्रांनी भारताच्या या असामान्य वृद्धीला चालना दिली आहे. प्रगतीची सर्वाधिक हमी असलेल्या, गतिशील आणि तरीही जास्त प्रकाशात न आलेल्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे भारतीय अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्र.

अलीकडच्या काही वर्षांत भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगाने अतिशय उल्लेखनीय वृद्धीच्या कक्षेतून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे आणि यापुढील काळात या वृद्धीत सातत्य राखण्याची प्रचंड क्षमता या क्षेत्रात आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून होणाऱ्या मूल्यवर्धनामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्र हे भारताच्या कृषी परिदृश्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना पूरक योगदान देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक बनले आहे. शाश्वत उपभोग (वापर) आणि उत्पादन संरचना सुनिश्चित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमुळे अन्नाची नासाडी टाळण्यावर भर देण्यात आला आहे. प्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानातील नवोन्मेष, शाश्वत संसाधनांची निर्मिती, पुनर्प्रक्रिया आणि शेतमालाचा सुयोग्य पद्धतींद्वारे कार्यक्षम वापर यांच्या माध्यमातून  अन्न प्रक्रिया उद्योग अन्नाची नासाडी टाळण्यामध्ये आणि विविध शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये एक उत्प्रेरक बनू शकतो. या बाबी विचारात घेता भारतीय अन्न प्रक्रिया उद्योग हा भविष्यात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक बनेल.

त्यामुळेच या क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने विविध प्रकारच्या धोरणात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अन्न प्रक्रिया क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) सुरू केली. या योजनेमुळे सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या भरीव गुंतवणुकीच्या माध्यमातून ५.४४ लाख रोजगार निर्माण होण्याची आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला भक्कम पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे. ‘सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे पीएम अधिकृतीकरण’ (पीएमएफएमई) ही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकृत क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सुरू केलेली आणखी एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. १० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेल्या या योजनेद्वारे सुमारे २ लाख सूक्ष्म उद्योगांना भांडवल संलग्न अनुदान मिळवता येईल. पीएमएफएमई योजनेअंतर्गत १५ कर्जदार बँकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत आणि २५ राज्यांसाठी प्रकल्प अंमलबजावणी योजना मंजूर झाल्या आहेत. प्रगती करत असलेल्या भारतीय फूड ब्रँडसना अन्न प्रक्रिया उसद्योगांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन लाभ (PLISFPI) या १० हजार ९०० कोटी रुपयांच्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचेदेखील केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे अन्न प्रक्रिया उद्योगांमधील उत्पन्न ३३ हजार कोटींनी वाढण्याची आणि तब्बल अडीच लाख इतकी रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

‘वर्ल्ड फूड इंडिया’ (डब्ल्यूएफआय) हा भारत सरकारचा दृष्टिकोन अधोरेखित करणारा, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सहभाग असलेला एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भारताच्या क्षमतेचे जगभरातील गुंतवणूकदार, अग्रणी उद्योजक आणि भागीदारांना दर्शन घडवण्यावर या भव्य उपक्रमाचा भर आहे. २०१७ मध्ये आयोजित डब्ल्यूएफआय उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला होता. देशातील २७ राज्यांमधील प्रतिनिधींसह जगभरातील ६१ देशांच्या प्रतिनिधींनी यामध्ये उपस्थिती लावली होती. देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातूनही या उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले होते. तेव्हाच या उद्योगात परिवर्तनकारक वृद्धी निर्माण होत असल्याचे दिसून आले.

आता, २०२३ मध्ये या उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सज्ज आहे. भारतीय आणि जागतिक अन्न प्रक्रिया उद्योगांचा खऱ्या अर्थाने संगम या माध्यमातून घडताना दिसेल. भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योगात अतिशय उत्तम प्रकारची निर्यात क्षमता आहे. जागतिक उद्योगातील आघाडीतील नावे यासोबत जोडलेली असल्याने भारतीय व्यवसायाला प्रक्रियाकृत खाद्यान्नाच्या अतिशय आकर्षक निर्यात बाजारपेठेमध्ये प्रवेशाची संधी यामुळे मिळेल. कृषी क्षेत्रातील कच्च्या मालापासून प्रक्रिया करण्याची सुरुवात होत असल्याने अन्न प्रक्रिया उद्योग हा प्राथमिक क्षेत्रावर उभारला गेलेला उद्योग आहे. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कृषी उत्पादक देश असल्याने अनेक वर्षांपर्यंत भारत अतिशय सहजतेने अन्न प्रक्रिया उद्योगात उच्च वृद्धी कायम राखू शकतो. तसेच सुमारे  १०% च्या आसपास रेंगाळत असलेला  भारतातील अन्न प्रक्रिया स्तर, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली क्षमता आणि तिचा वापर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात असलेला वाव याकडे निर्देश करत आहे.

वाढते शहरीकरण, उच्च उत्पन्न आणि सुविधाजनक अन्नाला पसंती यामुळे प्रक्रियाकृत खाद्यांची जागतिक मागणी  ४ % इतक्या स्थिर दराने वाढत आहे. जास्त लोकसंख्या, उत्पन्नाच्या स्तरात होणारी वाढ आणि भक्कम आर्थिक विकास यामुळे भारत  आपल्या सर्वात विश्वासार्ह क्षेत्रांपैकी एक असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाद्वारे गुंतवणुकीसाठी चांगली हमी असलेले स्थान बनला आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची आगेकूच सुरू असताना अन्न प्रक्रिया उद्योग त्यामध्ये एका मध्यवर्ती आसाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे.

नवोन्मेष, गुंतवणूक आणि धोरणाचे पाठबळ यांच्या योग्य एकत्रिकरणाद्वारे हा उद्योग या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टामध्ये लक्षणीय योगदान देऊ शकतो. वर्ल्ड फूड इंडिया २०२३ च्या माध्यमातून भारताची ही क्षमता अतिशय मोठ्या प्रमाणावर जगाचे लक्ष वेधून घेणार आहे. त्यामुळे भारताच्या विकासगाथेसह अतिशय उज्ज्वल जागतिक भवितव्य असलेल्या भारतीय अन्न प्रकिया उद्योगाच्या क्षमतेची चाचपणी करण्याची स्थानिक आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी हीच योग्य वेळ आहे. वर्ल्ड फूड इंडिया २०२३ हा एक ऐतिहासिक उपक्रम आणि जागतिक आव्हानांना भारताच्या क्षमतेद्वारे तोंड देणाऱ्या भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगाची दालने खुली करणारे प्रवेशद्वार ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -