Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखWorld Cup 2023 : ‘विराट’ विक्रमानंतर भारत जगज्जेतेपदाकडे

World Cup 2023 : ‘विराट’ विक्रमानंतर भारत जगज्जेतेपदाकडे

देशभरात दिवाळी सणाची धूम सुरू असतानाच क्रिकेटप्रमींसाठीही पर्वणी असलेली विश्वचषकाची धामधूम सुरू आहे. यंदा विश्वचषक आपल्याच देशात सुरू असल्याने आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला संघ दृष्ट लागावी असा विलक्षण फॉर्मात आहे आणि या विश्वचषकातील सर्व दहा सामने जिंकून विजयाची चटक लागलेल्या एखाद्या अपराजीताप्रमाणे आपल्या संघाची घोडदौड सुरू आहे. त्यातच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कमालीच्या रंगलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवत अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि जगज्जेता बनण्याच्या दिशेने केवळ एक पाऊल उरले आहे. भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. कारण वर्ल्डकपमध्ये भारताला अशी कामगिरी यापूर्वी कधीही करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये विराटने त्याचे पन्नासावे शतक झळकावून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराटने १०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराच्या जोरावर शतकाला गवसणी घातली. शतक पूर्ण केल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सचिनकडे पाहून विराटने नम्रपणे वाकून अभिवादन केले. सचिन तेंडुलकरनेदेखील विराटच्या शतकाबाबत त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले. एवढेच काय तर अनुष्का शर्माने देखील विराटच्या शतकानंतर एकच जल्लोष केला. त्याआधी विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून सचिनच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी केली होती. त्यानंतर दहाच दिवसांमध्ये विराटने सेमी फायनलमध्ये शतक करून एकदिवसीय सामन्यात पन्नास शतकांचा आकडा गाठला आहे. शतकांच्या अर्धशतकांचा ऐतिहासिक विक्रम त्याच्या नावे केल्यानंतर प्रतिक्रिया देताना विराटने हे सगळे माझ्यासाठी स्वप्नवत आहे असे म्हटले आहे. कारण ज्या सचिन तेंडुलकरला खेळताना बघून मी मोठा झालो. ते स्वतः स्टॅन्डमध्ये बसलेले होते, पत्नी अनुष्कादेखील उपस्थित होती. वानखेडेच्या क्रिकेट रसिकांसमोर पन्नासाव्या शतकापर्यंत पोहोचणे खरोखर मोठी गोष्ट होती. म्हणूनच हे शतक माझ्यासाठी खास आहे, अशा प्रांजळ भावना त्याने व्यक्त केल्या आणि क्रिकेट हा जेन्टलमन लोकांचा खेळ आहे हे दाखवून दिले.

विशेष म्हणजे कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून १८ ऑगस्ट २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच एकदिवसीय सामन्यांपासून झाली होती. मात्र योगायोग असा की विराटने श्रीलंकेविरुद्धच डिसेंबर २००९ त्याच्या वयाच्या २१ व्या वर्षी पहिले शतक केले होते. भारताकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पहिले शतक करायला विराट कोहलीला पंधरा सामने थांबावे लागले होते. त्यावेळी श्रीलंकेने समोर ठेवलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना विराटने त्याचे हे पहिले शतक होते आणि आता पन्नास शतकानंतर विराटला ‘चेज मास्टर’ म्हणून क्रिकेटरसिकांकडून जणू मान्यता मिळालेली आहे. मीरपूर येथे झालेल्या २०११च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या पहिल्या सामन्यात विराटने बांगलादेशविरुद्ध त्याचे पहिले शतक केले होते. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अॅडलेडमध्ये त्याने त्याच्या वर्ल्डकपमधल्या दुसऱ्या शतकाची नोंद केली होती. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्मा (७)च्या नावावर आहे तर त्याखालोखाल सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ६ शतके केली आहेत. या यादीत विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्याबरोबर चौथ्या क्रमांकावर आहे.

मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत विराट आता पहिल्या क्रमांकावर गेला आहे आणि एवढी वर्षे या यादीत पहिल्या नंबरवर असणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नाव आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिसेल. विराट आणि सचिननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर ३१ शतकांची नोंद आहे. या यादीमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे रिकी पॉन्टिंग (३०) आणि सनथ जयसूर्या (२८) हे आहेत. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (२७), एबी डिव्हिलियर्स (२५), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल(२५), श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा(२५) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (२२) हे त्यानंतरच्या पाच क्रमांकावर आहेत. हे पाहता सर्वाधिक शतके करणाऱ्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीतले केवळ रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हे दोनच खेळाडू सध्या क्रिकेट खेळत आहेत. इतर सगळे आधीच क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये सध्या १९ शतकांचे अंतर आहे, तर ३७ वर्षीय डेव्हिड वॉर्नर याला विराटच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी अजून २८ शतके करावी लागणार आहेत. विराट आणि रोहित व्यतिरिक्त सध्याच्या भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये के. एल. राहुलच्या नावावर ७ शतके आहेत, तर शुबमन गिलने त्याच्या छोट्याशा कारकिर्दीत ६ शतके झळकावलीत. वर्ल्डकपमध्ये सलग दोन शतके केलेल्या श्रेयस अय्यरने आजवर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण पाच वेळा १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ही सगळी यादी बघितली तरी नजीकच्या काळात तरी विराट कोहलीचा विक्रम मोडणे ही अशक्यप्राय गोष्ट वाटत आहे. विशेष म्हणजे काळानुसार क्रिकेटमध्ये झालेले बदल, नंतर बदलत गेलेले नियम, भारतीय संघाची परिस्थिती या सगळ्या गोष्टी पहिल्या तरीही विराटला सार्वकालीन महान खेळाडूचे बिरुद देता येऊ शकेल, असे काहींचे म्हणणे आहे. कारण काहीही असले तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये पन्नास शतके झळकावण्याचा बहुमान मिळवणारा विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातला आता एकमेव खेळाडू बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -