Monday, June 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळा

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळा

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या स्वायत्त संस्थेच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित केलेल्या होत्या. २१ मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला असून राज्याचा ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरची (औरंगाबाद) बुद्धिबळपटू तनिशा बोरमाणिकर हिने बुद्धिबळाच्या साथीने १०० टक्के गुण मिळविले आहेत. त्यात कोकण विभागाचा ९७.५१ टक्के निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अजून दहावीचा निकाल बाकी आहे. तेव्हा दहावीचा निकाल लागल्यानंतर करिअर मार्गदर्शन करण्यापेक्षा आता प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून कार्यशाळेचे आयोजन करावे. त्यासाठी संस्था चालकांनी पुढे येणे ही आजच्या विद्यार्थ्यांची खरी गरज आहे.

बऱ्याच वेळा बोर्डाचा निकाल लागल्यावर पुढे काय करावे याच्या शोधात आई-वडील असतात. त्यात मुलांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. नंतर पालक सांगतात की, आम्ही टक्केवारीचा विचार करीत होतो. तेव्हा सध्या निकालाची वाट बघत टक्केवारीचा विचार न करता शाळा संस्थापकांनी मुलांच्या हितासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे. त्यांना पुढील करिअर करणे सोपे किंवा विद्यार्थ्यांना स्वत:चा निर्णय स्वत: घेता येईल. त्याचप्रमाणे पालक वर्ग सुद्धा संभ्रमात पडणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना आपले करिअर ठरवायला अधिक सुलभ होईल.

आता बारावीचा निकाल लागला असून दहावीच्या निकालाचा अंदाज वर्तविला जात आहे. तेव्हा निकाल लागल्यानंतर कोणत्या शाखेकडे जावे याचा विचार करत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्याचे उत्तर आताच शोधावे लागेल. यासाठी पालक व मुलांनी एक विचार करणे आवश्यक आहे. दोघांमध्ये विसंगतपणा असता कामा नये. जर विसंगतपणा असेल, तर त्या शंकांचे निरसन करून आपल्या करिअरसाठी सज्ज झाले पाहिजे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. या परीक्षेनंतर खरी दिशा विद्यार्थ्यांची ठरत असते. याचे नियोजन आतापासून विद्यार्थ्यांना करावे लागेल. अनेक मार्ग असतात मात्र आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्याला आपल्या आवडीचा व आपल्या भविष्याचा विचार करून मार्ग निवडावा लागेल. त्या मार्गाचा आतापासून अभ्यास करावा म्हणजे पुढे आपला मार्ग सुलभ होईल. मित्र सांगतात म्हणून त्या मार्गाने जावू नका. तो मार्ग तुम्हाला यशस्वीरीत्या पार पाडायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. शेवटी मार्गदर्शक कोणीही असो आपला मार्ग आपणच निवडायचा असतो.

बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. कार्यशाळेमुळे विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळते. त्यासाठी शाळा प्रशासनाने आपल्या विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेमध्ये मुलांच्या भविष्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थी जर जास्त असतील तर त्यांचे गट तयार करून मार्गदर्शन करावे. अलीकडे कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची झाली आहे. तेव्हा आता मात्र शिक्षण संस्थांनी पुढे येणे आवश्यक आहे. कारण मागील दहा वर्षांचा शाळेतील मुलांच्या पटसंख्येचा विचार करता मुलांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यात मराठी शाळेच्या इमारती मुलांच्या प्रतीक्षेत असताना दिसत आहेत. त्यासाठी आता आपल्या संस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी अधिक संभ्रमात असताना दिसतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना कार्यशाळेची गरज आहे.

कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते. त्यामुळे निकालापूर्वी मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपली आवड लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड करता येते. तसेच करिअरचे विविध मार्ग सुद्धा समजू शकतात. त्यामुळे ते इतरांना सुद्धा करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे कार्यशाळेचा दुहेरी उपयोग विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्यासाठी शाळा प्रशासनाने कार्यशाळेचे आयोजन करावे. यात शाळेची सुद्धा नकळत प्रसिद्धी होत असते.

काही ठिकाणी पालकांच्या अपेक्षा मुलांकडून असतात. जर मुलांचा कल वेगळा असेल आणि त्यांच्यावर एखादी पदवी करायला सक्ती केली जात असेल, तर अशा वेळी मुलांचा ताण वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. अशा वेळी पालकांनी आपली जिद्द न करता अशा कार्यशाळेचा आधार घेऊन आपल्या मुलांचे भवितव्य घडवावे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास अधिक वाढतो. कार्यशाळेमुळे त्या कोर्सच्या अभ्यासक्रमाची माहिती झाल्याने आपण हा कोर्स सहजपणे अभ्यास करून उत्तीर्ण होऊ शकतो असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकतो.

मार्गदर्शक उत्तम असेल तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होऊ शकते. यातून विद्यार्थ्यांकडे असलेल्या कौशल्याला वाव मिळतो. हे खरे कौशल्य कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळत असते. तरी शाळा चालकांनी आपली संस्था व मुलांच्या भवितव्याचा विचार करून कार्यशाळेचे आयोजन करावे. अनेक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन घेऊन आपले करिअर घडविले आहे. यातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -