Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यस्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मी स्मारक समिती, नाशिक

स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मी स्मारक समिती, नाशिक

राष्ट्र सेविका समितीच्या विचारांनी प्रेरित होऊन देशभरात अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी काही संघटनांची आपण गेल्या भागात माहिती घेतली. आज आपण अशा एका संघटनेची माहिती घेणार आहोत, जे राष्ट्र सेविका समितीचे पहिलेच प्रतिष्ठान आहे. स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती हे प्रतिष्ठान नाशिकला आहे. पहिल्या संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. मावशी केळकर यांचं नाशिकला नेहमी येणं होत असे. त्यानंतर त्यांना नाशिकमधल्या सेविकांसाठी कार्य करायला एक हक्काची जागा असावी, असं प्रकर्षाने जाणवलं आणि म्हणून मग जागेचा शोध सुरू झाला. एका दानशूर व्यक्तींनी छोटसं कौलारू घर सुरुवातीला काम करायला दान केलं आणि संस्थेचे काम सुरू झालं. मावशी रामभक्त होत्या. रामायणावर त्या उत्तम वक्तव्य करत असत. त्यांचा २५ वा रामावरचा पारायणाचा कार्यक्रम नाशिकला त्याच दरम्यान सलग दहा दिवस मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता. समितीमध्ये राणी लक्ष्मीबाई, राणी जिजामाता आणि राणी अहिल्याबाई होळकर यांना शौर्य, मातृत्व यांचे प्रतीक मानातो. म्हणून या संस्थेला स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मी स्मारक समिती असे नाव दिले. प्रथम अष्टभुजा देवीचं मंदिर स्थापन झालं आणि राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा स्थापित केला गेला.

संस्थेचा असा अलिखित नियम आहे की, राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका याच या संस्थेच्या अध्यक्ष असतात. त्यामुळे सुरुवातीला मावशी केळकर आणि आता सध्या वंदनीय शांताक्का संस्थेच्या अध्यक्ष आहेत. मावशी केळकर यांची दूरदृष्टी खूप होती. नाशिक जिल्हा मोठा असून नाशिक शहरात ग्रामीण भागातून महिला नोकरी निमित्ताने येत असत. त्यांची राहण्याची सुरक्षित सोय व्हावी म्हणून सर्वात प्रथम वसतिगृह सुरू झालं आणि नंतर उद्योग मंदिर सुरू केलं. महिलांना जे स्वतःला सहजगत्या करता येतं ते करून विक्री करण्याचं काम येथे सुरू झालं. कामगार किंवा घरगुती काम करणाऱ्या किंवा छोट्या दुकानात काम करणाऱ्या महिलांना आपली लहान मुलं कुठे ठेवायची, असा प्रश्न पडत असे? काही वेळा लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या नोकरी सोडत असत, त्यामुळे अशा महिलांची मुलं सांभाळण्यासाठी अतिशय माफक दरात पाळणाघर सुरू करण्यात आलं. बालवाडी सुरू झाली. अंगणवाडी, बालवाडी सुरू झाली, पण त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते, हे लक्षात घेऊन या शिक्षकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सामाजिक कामाबरोबरच धार्मिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी भजन वर्ग, फक्त महिलांसाठी पौरोहित्य शिकवण्याचे वर्ग सुरू झाले. नाशिकमध्ये या वर्गातून शेकडो महिला आज पौरोहित्य शिकून काम करत आहेत. आजही ते वर्ग सुरू आहेत. काळाप्रमाणे बदलत राहणे, काळानुसार वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेणे, असं लवचिक धोरण संस्थेने राबवलं असल्यामुळे वेगवेगळ्या नवीन उपक्रमांची नेहमीच भर पडत आली आहे.

सुरुवातीला वसतिगृह मातीचं बांधलेलं होतं. नंतर अनेक दानशूर हातांच्या मदतीमुळे तिथे एक छानशी इमारत आता उभी राहिली आहे. या ठिकाणी दोन सुसज्ज हॉल उपलब्ध झाल्यामुळे तरुणींसाठी स्वसंरक्षण वर्ग, बालिका मेळावे, समितीची शाखा चालते, अभ्यास वर्ग होतात. वाचनालय सुरू केलंय इथे महिलांनी वाचन करून प्रगल्भ व्हावं, यासाठी आईबरोबर मुलीला विनामूल्य पुस्तक दिली जातात. शौर्याचं प्रतीक असलेल्या झाशीच्या राणीच्या जन्मदिवशी आणि संस्थेलाही राणी लक्ष्मीबाईंचं नाव असल्यामुळे शौर्य, पराक्रम गाजवणाऱ्या महिलेला पुरस्कार देणे सुरू केलं असून गेली ४ वर्षांपासून शौर्य पुरस्कार दिला जातो.

गीता जयंतीनिमित्त दरवर्षी भगवद्गीतेच्या एका अध्यायावर लेखी, पाठांतर व शुद्ध वाचन स्पर्धा घेण्यात येते. आषाढी एकादशीनिमित्त भगवद्गीता पठण, शारदीय नवरात्र उत्सवात श्री सूक्त पठण, भोंडला, भजनांचे कार्यक्रम होतात. दासबोध जयंती, भागवत सप्ताह, आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण भगवद्गीता पठण असे धार्मिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. धार्मिक सणांबरोबर १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सणही झेंडावंदन आणि भारत माता पूजन करून साजरे केले जातात. जुन्या कपड्यांचे संकलन हा खूप वेगळा उपक्रम संस्था राबवते. जुन्या कपड्यांची पावसाळ्यात पाड्यांवर गरज असते, ते पाहून संस्थेने जुने कपडे जमा करून त्याबरोबर लाडू, चिवडा असा खाऊ हरसूल येथील बेरवळ या गावाला पाठवण्यात आले. हे कपडे आदिवासींना उपयोगी पडतात. गेल्या वर्षी दोन टेम्पो भरून कपडे जमा झाले होते.

कै. इंदुमती गायधनी अन्नदान योजनेअंतर्गत टी. बी. सॅनेटोरियममध्ये फळं वाटप तसेच इगतपुरी तालुक्यात कुपोषित माता व मुलांना प्रोटीन पावडरचे विनामूल्य वाटप करण्यात आलंय. कै. जान्हवी मोडक रुग्णोपयोगी साहित्यामध्ये ३८ लोकांनी कमोड चेअर, व्हीलचेअर, सेमी फाऊलर बेड, कॉट, वॉकर इ. साहित्याचा लाभ घेतलाय.

योग वर्ग घेतले जातात. कोरोना काळात घेतलेल्या Online योग वर्गाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आपल्या धार्मिक सण आणि व्रत्तवैकल्यामध्ये सामाजिक आणि पर्यावरणाचा विचार केला गेला आहे. वटपौर्णिमा केवळ वडाची पूजा करून साजरी न करता पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन उद्योग केंद्राने वडाची रोपे उपलब्ध करून दिली होती. संस्था ६४ वर्षे जुनी असल्यामुळे संघाच्या तसेच समितीच्या अनेक महनीय व्यक्तींनी या ना त्या कारणामुळे संस्थेला भेट दिली आहे. यामध्ये अगदी माजी पंतप्रधान माननीय अटलबिहारी वाजपेयी, समितीच्या सर्वच संचालिका यांचं वारंवार येथे येणं होतं. त्याशिवाय आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज उच्च न्यायालयात वकील असलेले विवेक तांबे हे देखील दरवर्षी शौर्य पुरस्काराला स्वतःहून आवर्जून उपस्थित राहतात. स्वसंरक्षणाचं शिक्षण ही सध्याच्या काळात मुलींची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळे संरक्षण वर्ग नाशिकमधल्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन संस्थेतर्फे स्वतःहून आयोजित केले जातात.

कोविडमुळे निर्माण झालेले इतर परिणाम लक्षात घेऊन प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रोटीन पावडर उद्योग केंद्रात तयार करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्रीसाठी ठेवली होती. अगदी कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनामुळे रोजगार केलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्याचं कामही संस्थेतर्फे करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे समाजापर्यंत तिळगूळ पोहोचवता येत नाही म्हणून बेरवळ येथे साडेतीन किलो तिळलाडू पाठवण्यात आले होते. संक्रांतीच्या काळात बचत गटातील चाळीसएक महिलांना तिळगुळाचे लाडू व वड्या करण्याचे प्रशिक्षण दिले होते.

झाशीच्या राणीची पुण्यतिथी आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वय वर्ष ८ ते ७८ मधील २७ स्पर्धकांनी जोशपूर्ण गीते सादर केली. आपण महिलांसाठी काम करत आहोतच; परंतु समाजात इतरांनाही मदतीची गरज लागली, तर आर्थिक हातभारही संस्था लावत असते. जनकल्याण समितीला मदत म्हणूनऑक्सिजन मशीन घेण्यासाठी रु. ५००००/- संस्थेने दिले होते. कोरोना काळात ऑक्सिजन सिलिंडरची जास्त गरज लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली होती. सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे. लोक लोकांपर्यंत सहजगत्या पोहोचता यावं म्हणून जून २०२१ मध्ये फेसबुक पेज तयार करण्यात आले. त्या पेजवर संस्थेची माहिती, उपक्रम तसेच विविध व्याख्यानही आयोजित केली जातात. भविष्यात, नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व देण्यात आलं आहे. ते पाहता मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे, त्याची हळूहळू सुरुवातही झाली आहे. त्याशिवाय आणखी सेवा कार्य म्हणून ‘घे भरारी’ हा एक उपक्रम नुकताच सुरू केला आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दहा मुलींना, ज्या पुढचं उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा मुलींना विनामूल्य राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय संस्था उपलब्ध करून देत आहे. त्यापैकी एक मुलगी यंदाच प्राध्यापक म्हणून रुजू झाली आहे.

थोडक्यात राष्ट्र सेविका समितीचे विचार पुढे नेत समाजातील महिलांना ज्या ज्या गोष्टीची गरज असेल, ते ते विविध उपक्रम हाती घेऊन आणि कालानुरूप उपक्रम राबवण्याचे काम गेली ६४ वर्षे स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मी स्मारक समिती संस्था करत आहे.

-शिबानी जोशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -