Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआवाज कुणाचा, नारायण राणेंचा

आवाज कुणाचा, नारायण राणेंचा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सिद्धिविनायक पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आणि महाआघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलला अक्षरश: धूळ चारली. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाने त्यांना दिलेले महत्त्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खुपते आहे. त्यांना भाजपने राज्यसभेवर खासदार केले आणि नंतर केंद्रात मंत्रीपद देऊन सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग असे महत्त्वाचे मंत्रालय सोपवले. राणेंचे यश व त्यांची भरभराट झाली की, शिवसेनेच्या नेत्यांचे नेहमीच पोट दुखू लागते. राणे व त्यांच्या परिवाराचे सारे सार्वजनिक जीवनच संघर्षमय आहे. पण त्यांनी संघर्ष करणारे व त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे हजारो कार्यकर्ते उभे केले. सामान्य व गोरगरिबांना मदत करून हजारो संसारांना संकटाच्या काळात आधार दिला. त्यांचे सार्वजनिक काम हीच त्यांची अफाट पुण्याई आहे. त्यामुळे त्यांना कोणी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तर रोखणारेच संपतात. पण राणे व त्यांच्या परिवाराचे काहीच वाकडे होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे.

सिंधुदुर्ग म्हणजे राणेच हे चांगले ठाऊक असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाआघाडीचे दिग्गज नेते तिथे प्रचाराच्या काळात मुळात गेलेच कशाला? उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), उदय सामंत (शिवसेना) आणि सतेज पाटील (काँग्रेस) हे तिघे मंत्री ठाकरे सरकारमध्ये आहेत. तिथे जाऊन त्यांनी राणेंच्या विरोधात डरकाळ्या फोडण्याचा आव आणला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही हे निवडणूक निकालाने स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक कोणत्याही परिस्थितीत नारायण राणे व त्यांच्या समर्थकांच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही, असा चंग महाआघाडी सरकारने बांधला होता. राणे हे केंद्रीयमंत्री असल्याने त्यांच्या मतदारसंघात व गृह जिल्ह्यात त्यांचा पराभव करण्यासाठी सरकारने सर्वस्व पणाला लावले. निवडणूक काळात पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि हजारो पोलिसांची तैनात या जिल्ह्यात करून राजकीय संभ्रमाचे वातावरण होईल, असा प्रयत्न सरकारने केला. खरे म्हणजे सहकार व विकास या मुद्द्यांवर निवडणुकीत प्रचार होणे, अपेक्षित होते. पण महाआघाडीने या निवडणुकीत दहशतवाद हा मुद्दा लावून धरला. राणे परिवाराची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत मोडून काढायची आहे, असा खुलेआम प्रचार महाआाघाडीने केला.

ठाकरे सरकारमधील तीन मंत्री येथे आले याचा अर्थ राणेंच्या विरोधात ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्ष सर्व तयारीनिशी उतरले होते. तीन मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेवर दबाव येतो हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण बँकेच्या मतदारांनी महाआघाडीने मांडलेला दहशतवादाचा मुद्दा झुगारून लावला. ‘राणे आमचे आणि राणेंचा हा जिल्हा’ असा संदेश या निवडणूक निकालाने दिला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीच्या मैदानात ३९ उमेदवार होते. दहशत असती, तर एवढे उमेदवार उतरले असते काय? महाआघाडीचे उमेदवार निर्भय वातावरणात प्रचार करू शकले असते काय? राणे व त्यांच्या परिवारावर वाट्टेल ते आरोप करण्याची कुणाची हिम्मत झाली असती काय? जिल्ह्यात दहशत आहे, असे जनतेला व मतदारांना मुळीच वाटत नाही. उलट राणेंची प्रतिमा ही विकासपुरुष अशीच राहिली आहे. राणे परिवार म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आधार कार्ड आहे. पण ज्यांना राणे यांचे यश व लोकप्रियता खुपते तेच दहशतवाद हा मुद्दा गिरवताना दिसतात.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यानंतर राणे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष केला. ‘नितेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या गेल्या. खरं तर, या बँकेचा निकाल काय लागणार हे सहा महिन्यांपूर्वीच स्पष्ट होते. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेवर भाजपचा झेंडा फडकणार, असेच वातावरण होते. पण त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न महाआघाडीने केला, पण तो फोल ठरला. निवडणुकीत भाजप जिंकणार व आम्हीच फटाके वाजवणार, असे राणे समर्थक आधीपासून सांगत होते, तेच वास्तवात उतरले. चार कुत्र्यांच्या भुंकण्याने नारायण राणे साहेबांचे नाव किंचितही कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली. हीच भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.

या निवडणुकीत राणे यांना ज्याने आव्हान दिले ते बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. तसेच उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालाने महाआघाडीला धडा शिकवला. शिवसेनेला अद्दल घडवली. विनायक राऊतांना त्यांची जागा दाखवली. वैभव नाईकांनी राणेंच्या विरोधात केलेली बडबड वाया गेली. राणे विरोधाची कावीळ झालेल्या सतीश नाईकांना घरी बसावे लागले. ठाकरे सरकारच्या तीनही मंत्र्यांचा लोच्या झाला. अजित पवार यांची अवस्था हात दाखवून अवलक्षण अशी झाली. सदैव घरात बसून मांडे खाणाऱ्या मामुची अवस्था केविलवाणी झाली. निकालानंतर नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे जय हो म्हणून सर्वत्र जयजयकार ऐकायला मिळाला. राणे परिवार लय भारी, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता कोकणात सर्वत्र भाजपचे कमळ फुलणार. या बँकेच्या निमित्ताने झालेल्या राजकीय युद्धात राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपला साथ देणाऱ्या सर्व मतदार, समर्थकांचे आभार व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! सिंधुदुर्गचा निकाल ही मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाची नांदी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -