Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीराष्ट्रवादीची जागा शिरुरमधून कोण लढणार? अमोल कोल्हे की?

राष्ट्रवादीची जागा शिरुरमधून कोण लढणार? अमोल कोल्हे की?

शिरुरमधील बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; अमोल कोल्हे म्हणतात...

शिरुर : महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन वाद सुरु असतानाच आता पक्षांतर्गतदेखील उमेदवारीसाठी चढाओढ सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे असताना आताच्या निवडणुकीत खासदारकी अन्य उमेदवाराला जाणार का अशा चर्चा रंगत आहेत. याचे कारण म्हणजे विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यातून विलास लांडे यांनी खासदारकी मिळण्यासाठी इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ९ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून कोणकोणते उमेदवार कोणत्या जागा लढवतील, यासंबंधी चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच शिरुरमधील विलास लांडेंच्या बॅनरबाजीमुळे या जागेच्या उमेदवारीसाठी नवा नाद निर्माण होईल की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.

उमेदवारीबाबत विलास लांडे आग्रही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असून २००९ पासूनच माझा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विलास लांडे आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अडसर ठरण्याची शक्यता आहे. २०१९ ला लांडे यांची पूर्ण तयारी झाली होती, तेव्हा ऐनवेळी राजकारणापलीकडे जाऊन सिनेकलाकार कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

मात्र आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मतदारसंघात भावी खासदार अशी बॅनरबाजीदेखील केली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या २३ लाखांची आहे. या भागात माझा मोठा जनसंपर्क आहे आणि म्हणूनच मी शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असं ते म्हणाले.

शर्यत अजून संपली नाही…

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विलास लांडेंसोबत माझी सविस्तर चर्चा न झाल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. “२००९ साली लोकसभा निवडणूक लढवलेले विलास लांडेजी पुन्हा शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोणालाही महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही, त्यामुळे लांडेजींना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. पण असं म्हणतात की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही” असा टोला त्यांनी लगावला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब आणि मायबाप मतदारांच्या आशिर्वादामुळे एक सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खासदार म्हणून निवडून आल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले. या प्रतिक्रियेदरम्यान त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच अजून कार्यकाळ संपलेला नाही त्यामुळे मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी यापुढील काळातही मी कार्यरत असेन, असं अमोल कोल्हे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -