Monday, May 13, 2024
Homeमहत्वाची बातमीकोण होणार मुख्यमंत्री?

कोण होणार मुख्यमंत्री?

पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण

मुंबई : गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. तर दुसरीकडे नागपुरात देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. कुणी स्वत:ला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून दावा करते. तर कुणी २०२४ला कशाला आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असे म्हणतो. तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचे नेते देवाला साकडे घालत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुटीवर गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी भूषवले आहे. ते २०१९ला पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. तशी त्यांनी अजित पवारांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु ते पद औटघटकेचे राहीले. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे खूर्ची आली. पण त्यांची खूर्ची त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी हलवली. उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर त्याच खुर्चीवर एकनाथ शिंदे विराजमान झाले. हा संगीत खुर्चीचा खेळ राजकारणात सुरूच आहे. या खुर्चीसाठी आता अजित पवार यांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनाही धक्का बसला होता. त्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदी अजूनही देवेंद्र फडणवीस असल्याचे मानले जात आहे. हे चंद्रशेखर बावनकुळे असो की, अन्य नेते त्यांच्या मुखातून सातत्याने हीच गोष्ट येत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे फक्त चेहरा असून राज्य कारभार देवेंद्र फडणवीस चालवत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन राज्यात ‘कौन बनेगा सीएम’ अशी स्पर्धाच सुरू झाली आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देताना नागपूरच्या बॅनर प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या कोणी ते बॅनर लावले आहेत, ते त्यांनी काढून टाकावेत. अतिउत्साही लोक असतात, तेच असे करतात.

फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -