Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरामदास कदम निष्ठावान शिवसैनिक आहेत हे कुणी सांगितलं?

रामदास कदम निष्ठावान शिवसैनिक आहेत हे कुणी सांगितलं?

नारायण राणेंची जोरदार टोलेबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत हे तुम्हाला कुणी सांगितलं. ते किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत हे तुम्हाला माहीत आहे का?,’ असा प्रतिप्रश्न करत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, असं तुम्हाला कुणी सांगितलं? किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत ते तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं त्यांच्या विषयी प्रश्न विचारू नका,’ असं राणे म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना बाहेर राहण्याचा अधिकार नाही, ते तुरुंगातच असायला हवेत, असंही राणे यावेळी म्हणाले.

अँटिलिया प्रकरणात कोठडीत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस अधिका-यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यानंतर अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. त्याशिवाय, परब यांच्यावर अनधिकृत बांधकामाचेही आरोप आहेत. त्याबाबतची माहिती रामदास कदम यांनीच एका आरटीआय कार्यकर्त्यामार्फत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.

रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील ऑडिओ संभाषणही व्हायरल झालं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणंही टाळलं होतं. कदम यांनी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले असून शिवसेना कधीही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याच अनुषंगानं पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला राणे यांनी आपल्या खास स्टाइलनं उत्तर दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -