Saturday, May 4, 2024

ती कोण?

प्रा. देवबा पाटील

बरं का बालमित्रांनो! आज मी तुम्हाला एक गंमतशीर जंमत सांगत आहे. तुम्ही ती ओळखायची. अर्थात तुम्ही सारेच हुशार असल्याने तिला पटकन ओळखाल ही मला खात्रीच आहे. त्या दिवशी बघा सकाळची वेळ होती. सूर्योदय केव्हाचाच झालेला होता. लख्ख ऊन पडले होते. मी एका कामानिमित्त असाच फिरत फिरत, रमत गमत रस्त्याने पायी चाललो होतो. माझे सहज तिकडे लक्ष गेले, तर ती सुद्धा माझ्याबरोबरच येत होती. पण ती उंचीने म्हणा किंवा लांबीने म्हणा माझ्यापेक्षा बरीच मोठी होती; परंतु सूर्य जसजसा माथ्यावर येत गेला तसतशी ती लहान-लहान होत गेली. आहे का नाही गंमत? आणि हो! आणखी एक गंमत! सूर्य मध्यान्हावर म्हणजे माझ्या डोक्यावर असताना तर ती नाहीशीच झाली. मी म्हटलं, बरं झालं. बरी बला गेली. त्यामुळे मी तिच्याकडे काहीच लक्ष दिले नाही. माझ्या कामासाठी निघून गेलो.

थोड्या वेळाने माझे काम संपल्यावर मी परत निघालो. मात्र पुन्हा अचानक ती माझ्या मागे माझी सोबत करायला हजर झालीच. कुठे गेली होती ती आणि कोठून आली? तिचे तिलाच माहीत बिचारीला. यावेळी दुपारनंतर मात्र सूर्य जसजसा खाली खाली पश्चिमेकडे जाऊ लागला, तसतशी ती मात्र मोठी मोठी होत गेली. म्हणजे गंमतच झाली का नाही?
बरे त्यातल्यात मी चालायला लागलो की, तीसुद्धा चालू लागे आणि मी थांबलो की, तीसुद्धा थांबत असे. पण चालताना जरी माझ्या पावलांचा आवाज झाला तरी तिच्या पावलांचा मात्र मुळीच आवाज होत नसे. थोडे पुढे गेल्यानंतर मला माझा एक मित्र भेटला. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि काय आश्चर्य! तिने सुद्धा त्याच्यासोबत हस्तांदोलन केले. मी त्याच्याशी इकडच्या-तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यात. ती मात्र एका शब्दानेही त्याच्याशी बोलली नाही. प्रथम मला वाटले की, अचानक अनोळखी व्यक्तीसोबत हस्तांदोलन केल्याने ती बोलण्यास लाजत असावी.

पण खरी गोष्ट अशी होती की, त्या दोघींनाही बोलताच येत नव्हते. तिला बोलता जरी येत नव्हते, तरी ती मात्र माझ्या प्रत्येक कृतीसारखी प्रतिकृती हुबेहुब करायची. संध्याकाळ झाली. अंधार पडल्यामुळे मी घराकडे परतलो. आता मात्र तिची बोबडीच वळली. अंधाराला घाबरून ती कोठे पळाली, तर पत्ताच लागला नाही.

गावात आल्यानंतर रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशात पुन्हा ती भीत भीत हळूहळू माझी सोबत करू लागली. ती कशी जाते आणि कशी येते हे मात्र कळू देत नाही. घरी लख्ख प्रकाशात पोहोचेपर्यंत सुद्धा तिने माझी साथ सोडली नाही. मात्र रात्री झोपताना मी लाइट बंद केला नि पुन्हा ती अंधाराला घाबरून गायबच झाली.
तर सांगा बालमित्रांनो, अशी नेहमी साथ देणारी ती सोबतीण कोण होती?

(उत्तर :- सावली)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -