Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीहिंडेनबर्ग कोण? माहिती नाही पण अदानींचे योगदान मान्य करावे लागेल

हिंडेनबर्ग कोण? माहिती नाही पण अदानींचे योगदान मान्य करावे लागेल

विरोधकांच्या अदानी जेपीसी चौकशी प्रकरणी शरद पवार यांची वेगळी भूमिका

मुंबई : अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हिंडेनबर्ग अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. या अहवालाप्रकरणी शरद पवार यांना विचारण्यात आले असता पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहितीही नाही. एक परदेशातील कंपनी काही तरी अहवाल बनवते व त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अदानी व हिंडेनबर्ग अहवालावर आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहिती नाही. मला एवढेच माहिती आहे की ती एक परदेशातील कंपनी असून काही तरी अहवाल बनविण्याचे काम करते. मात्र त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. परंतु हे काही योग्य नाही. अशा अहवालाकडे किती लक्ष द्यायचे, याचाही विचार केला गेला पाहीजे. एखाद्या संस्थेने आपल्या देशातील उद्योगाबद्दल सांगण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने त्याविषयी सांगणे अधिक योग्य व विश्वासार्ह आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

याबाबत स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी सांगितले कू, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे १५ खासदार असतील. उर्वरित ६ ते ७ खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे.

शरद पवार म्हणाले, जेपीसीत भाजपचेच बहुमत असेल तर ती उपयुक्त ठरणार नाही, याची मला खात्री आहे. मी स्वत: एका जेपीसीचा अध्यक्ष राहिलेलो आहे. त्याऐवजी सुप्रीम कोर्टानेच या घोटाळ्याची चौकशी करणे उपयुक्त राहील. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून व त्यांच्यासोबत सत्ताधारी व विरोधकांचे काही सदस्य घ्यावेत. अशी कमिटी अधिक उपयुक्त ठरेल. बहुमताच्या आधारे घोटाळ्याबाबत निर्णय होणार असेल तर ते निरुपयोगी ठरेल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपनीत एलआयसीचे पैसे बुडाल्याचा आरोप केला आहे. तसेच, अदानींच्या कंपनीत गुंतवणूक झालेले २० हजार कोटी रुपये कोणाचे?, असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे. यावर शरद पवार म्हणाले, एलआयसी व २० हजार कोटींबाबतची माहिती माझ्याकडे नाही. त्याची आकडेवारी घेऊनच मला त्यावर भाष्य करता येईल. तसेच, केवळ अदानीवर चर्चा करण्याऐवढा हा मोठा विषय आहे का?, याचाही विचार केला पाहीजे. देशात सध्या बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या समस्या या तीन प्रमुख समस्या आहेत. यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

पवार यांनी टाटा, अदानी व अंबानी यांच्यावर देखील भाष्य केले. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक विजेचा पुरवठा हा अदानी समूहाच्या कंपनीकडूनच होतो आहे. परंतु याबाबत मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान हे मान्य करावे लागेल. यापूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असे. मात्र, नंतर ज्येष्ठ उद्योगपती टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -