Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआता गरज तीनची नाही, पाचची...

आता गरज तीनची नाही, पाचची…

  • मुंबई ग्राहक पंचायत : वैशाली पारवेकर

आपण परिधान केलेल्या कपड्यांपासून ते खात असलेल्या अन्नापर्यंत जगभरातील कुटुंबासाठी आणि समुदायांसाठी प्लास्टिक हे घरगुती घटक बनले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या प्लास्टिकचे विघटन होण्यास सुमारे ४५० ते १००० वर्षं लागतात. हे सर्व समजून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे, कारण केवळ ज्ञानानेच आपण परिवर्तनासाठी आवश्यक कृती करू शकतो.

आजच्या घडीला नित्यनेमाने सुमारे ४३८ दशलक्ष टन नवीन प्लास्टिक तयार होतेय आणि हे प्रमाण वाढतच आहे. आपण जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या सर्व प्लास्टिकपैकी १०% पेक्षाही कमी प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. बाकीचा सुमारे ७९% प्लास्टिक कचरा आजही लँडफिल (जमिनीमध्ये पुरणे)मध्ये जातो आणि ११% जाळून टाकला जातो. प्लास्टिक बनवण्यासाठी जीवाश्म इंधन (Fossil fuel) नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल (crude oil) यांचा वापर करण्यात येतो. म्हणून प्लास्टिक उद्योग जगातील उद्योग हरितगृह वायूंचा (greenhouse gas) सर्वात वेगाने वाढणारा स्त्रोत आहेत. पाचशे मेगावॅट कोळसा ऊर्जा निर्माण करणाऱ्या साधारण १८९ प्रकल्पांमधून उत्सर्जित होणाऱ्या उत्सर्जनाइतके वायू आपल्या घरातील प्लास्टिक उत्सर्जन करत असतात. म्हणजेच प्लास्टिक बनताना आणि नष्ट होताना दोन्ही वेळी प्रदूषण होतच असते. जमिनीच्या प्रदूषणाबरोबरच हवेचेही प्रदूषण होत असते. केवळ जमिनीचे, हवेचेच नाही तर पाण्याचेही प्रदूषण होत असते. प्रदूषणामुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड जवळच्या पाणीसाठ्यातच नाही, तर लांबवरच्या समुद्राच्या पाण्यात देखील विरघळतो. त्यातून समुद्राच्या पाण्याची आम्लता वाढते. परिणामी समुद्रातील प्राण्यांचे जीवन देखील धोक्यात येते.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने IOGL दरवर्षी १०० दशलक्ष PET बाटल्यांचा पुनर्वापर करत त्यापासून कापड निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच कापडापासून तयार केलेले जॅकेट परिधान केलेल्या आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण नुकत्याच संपलेल्या संसदेच्या सत्रात पाहिले होते. असा पुनर्वापर करणे म्हणजे डाऊन सायकलिंग. हे ज्वलन किंवा लँडफिलींगपेक्षा नक्की चांगले. पण वस्तुस्थिती अशी आहे की, पुनर्वापर किंवा पुनर्नवीकरण या प्रक्रियांनी प्लास्टिक कचऱ्याच्या प्रश्न संपत नाही, तर ते निरुपयोगी होईपर्यंत फक्त त्यात विलंब आणू शकतो. शेवटी ते लँडफिलींग मध्येच जाते आणि हळूहळू विघटीत होऊन ‘मिथेन’ गॅस बाहेर उत्सर्जित करते. यामुळे हवामानातील बदल (global warming) देखील वाढत आहे.

या सर्व गोष्टींना गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. आपण सर्वांनी हवामान व प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटांना कटाक्षाने योग्य मार्गाने हाताळले पाहिजे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर करताना केवळ तीन नाही तर (Five ‘R’) पाच ‘R’ पद्धतीचा वापर करू या.

या पाच ‘आर’मधील पहिला ‘आर’ म्हणजे नकार किंवा रिफ्युज : व्यावसायिकाच्या किंवा ग्राहकांच्या धोरणातील ही पायरी प्लास्टिक कचरा कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. टाकाऊ किंवा पुनर्वापर करता न येणारी उत्पादने खरेदी करण्यास नकार द्या.

दुसरा ‘R’ म्हणजे (Reduce) कमी करा : हानिकारक, टाकाऊ आणि पुनर्वापर न करता येणाऱ्या उत्पादनांचा वापर कमी करा.

तिसरा ‘R’ (Reuse) पुन्हा वापरा : एकदा सामग्री वापरणे आणि फेकून देणे (use & throw) किंवा ‘फेकून द्या’ संस्कृती. आपण ज्या गतीने प्लास्टिक वापरत आहोत ते जगातील सर्वात मोठे पर्यावरणीय आव्हान बनले आहे. कचरा कमी करण्याच्या प्रयत्नात, नवीन खरेदी करण्याऐवजी वस्तूंचा पुनर्वापर करा.

चौथा ‘R’ म्हणजे (Repurpose) इतर काही कामासाठी वापरा: प्लास्टिक वस्तू फेकण्याऐवजी पुन्हा वापरण्यासाठी काही झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याच्या बाटलीचा वापर. तेलाचे डब्बे किंवा मोठे जार यांचा लहान रोपटे वाढीसाठी वापर.

पाचवा ‘R’ (Recycling) पुनर्नवीकरण : लँडफिलींगमध्ये कमीत कमी प्लास्टिक जावे असे केवळ पुनर्वापरानीच शक्य होते. तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर ‘रिकव्हर’साठी होऊ शकतो. या उपकरणात तांबे, चांदीसारखे मौल्यवान धातूंचा उपयोग केलेला असतो. ते धातू परत मिळवता येऊ शकतात.

पुनर्वापर (Recycle) हे कायम प्रथम क्रमांकावर असते पण आजच्या काळाच्या गरजेनुसार ते शेवटच्या क्रमांकावर असावे हेच योग्य. प्लास्टिक पुनर्नवीनीकरण यावर ISO मानके कशी मार्गदर्शक ठरू शकतात ते पाहू या.

ISO ५२७० : २००८ हे प्लास्टिक कचरा पुनःप्राप्ती आणि पुनर्वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करते. पुन:प्राप्ती (Recovery)च्या प्रत्येक पायरीमधील गुणवत्तेची आवश्यक चाचणी व उत्पादन वैशिष्ट्यांमध्ये बदलाच्या सामान्य आवश्यक चाचणी करण्याची शिफारस प्रदान करते.

ISO २२५२६ आणि ISO ६६२० : हे मानक प्लास्टिकच्या कार्बन आणि पर्यावरणीय घटकांवरील प्रभाव नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या मानकांमुळे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होते. तसेच हवामानातील बदल कमी करण्यास व त्यांच्याशी जुळवून घेण्यास मदत करणारी नवीन मानके पण उपयोगी पडतात.

ISO / ८८३०: २०१६ हे मानक समुद्राच्या पाण्यात / वालुकामय गाळ असलेल्या भागात खोलवर फसलेले प्लास्टिक सामग्रीचे जैविक विघटन होऊन ऑक्सिजनचे प्रमाण निर्धारण करते.

ISO २२७६६ : २०२० हे मानक वास्तविक स्थितीत सागरी क्षेत्रांमधील प्लास्टिक विघटनाची सुनिश्चिती करते. लक्षात असू द्या की,

पर्यावरण स्वच्छ असेल तर मानवाचे आणि प्राण्यांचे जीवन आनंदी आणि सुखकर राहील. आज आपण आहोत पण उद्या आपल्याच पुढील पिढीतील नातवंडे, पंतवंडे असणार आहेत. त्याचेही जीवन सुखकर राहिले पाहिजे. आपल्याकडे निदान आज तरी राहण्यायोग्य एकच पृथ्वीतल आहे. ते निवासायोग्य न
राहिल्यास चराचर सृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे. म्हणूनच आतापसूनच खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -