Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल असताना आदित्य रचत होते मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र...

उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल असताना आदित्य रचत होते मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र…

> आमदार नितेश राणे यांनी केला गौप्यस्फोट > आमदार राजन साळवी उबाठा सेनेला समर्थन देत नाहीत, त्यांचे आधी समर्थन घ्या

कणकवली (प्रतिनिधी) : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा आदित्य ठाकरे आणि त्यांचे मित्र दाओसला मजा मारत होते. वडील आजारी असताना आदित्य ठाकरे हे जसलोकमध्ये बसून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे प्लानिंग करत होते’, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली येथे माध्यमांशी बोलताना केला. ‘बारसूतील लोकांचे समर्थन मिळवल्याशिवाय बारसूचा प्रकल्प पुढे दामटवणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे समाधान केले जाणार आहे. जो विषय आमदार राजन साळवी यांना कळला, तो विषय त्यांच्या गटप्रमुख विनायक राऊत, संजय राऊत यांना का कळत नाही? यातच राजकारण लपलेले आहे’, अशी टीका यावेळी आमदार राणे यांनी केली.

फडणवीस यांनी मॉरिशसवरून आदेश दिले, असा आरोप करणारे संजय राऊत हे तिथे रूमबॉय म्हणून काम करत होते काय? बारसूत वातावरण बिघडविण्याचे आदेश मातोश्रीवरून आलेत का? याच्या खात्रीसाठी विनायक राऊत यांचा मोबाइल तपासा मग कळेल, मातोश्रीवरून किती फोन गेले ते, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्प इस्लामिक देशातून आला म्हणता, मग आदित्य ठाकरे यांनी मागविलेल्या बेस्टच्या बसेस पाकिस्तानवरून आल्या होत्या, ते तुम्हाला कसे चालते. कारण खासदार संजय राऊत पाकिस्तानचा एजंट असल्यामुळे त्यांना हे चालते. याच संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे पत्राचाळीतले लोक बेघर होत होते. बारसूला जाण्याआधी मालकाला घेऊन पत्राचाळीत जाऊन दाखव, तेथील मंडळी कपडे फाडून परत पाठवतील, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.

‘बारसूत ७० टक्के लोकांची सहमती नाही हे संजय राऊत यांना कसे कळले? बारसूत बाकीच्यांचे सोडा, पहिले तुम्ही या प्रकल्पात आ. राजन साळवींचे समर्थन उबाठा सेनेने मिळवून दाखवावे. तुमच्या या आमदाराचे पहिले परिवर्तन होते काय बघा. जे जनतेतून निवडून आलेले आहेत. राजन साळवी हे प्रकल्प होण्यासाठी आग्रही आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत बारसूमध्ये लोकांशी चर्चा व बैठका घेणार आहेत. संवाद साधून समाधान करत आहेत’, असे राणे यांनी सांगितले.

‘सामना’मधून सापाची उपमा देणारा अग्रलेख आलाय. संजय राऊतना विचारेन की, तुझ्या मालकाच्या मुलाला पाहून मी म्याव म्याव आवाज काढलेला, तेव्हा तुझ्या मालकाला मिरच्या का लागल्या? तुझ्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का? त्याला म्याव म्यावचीच उपमा देणार. असे सांगून आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल आमदार नितेश राणे यांनी करून दाखविली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -