Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्ययेशील कधी परतून?

येशील कधी परतून?

अंजली पोतदार, मुंबई ग्राहक पंचायत

माझ्या घराच्या शेजारची जागा लिव्ह लायसन्स प्रकारात मोडत असल्यामुळे मला दरवर्षी नवी शेजारीण मिळण्याचे भाग्य लाभते. या वर्षीही मार्चमध्ये एक तरुण मुलगी शेजारीण म्हणून लाभली. लगेच ओळख करून घेऊन मदतीला मी तत्परच. एप्रिल महिन्यात एक दिवस संध्याकाळी बेल वाजवून दारात उभी. डोळे रडून लाल झालेले. मी घाबरलेच. म्हटलं काय बाई झालं हिला? तर रडतच म्हणाली, “काकू, माझा मोबाईल मारला कोणीतरी. मी आता येताना रस्त्यातून मोबाईलवर बोलत होते. तर एक मोटरसायकल मागून आली आणि मागे बसलेल्या माणसाने माझा मोबाईल खेचून घेतला. मोटरसायकल वेगात निघून गेली. आता काय करू मी?”

मोबाईल, त्यातही स्मार्टफोन हा आज आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला आहे. तो हरवणे किंवा चोरीला जाणे ही कल्पनाच घाबरवून टाकणारी आहे. कारण आपला संपर्क क्रमांक, फोटो, व्हीडिओ, आर्थिक तपशील, समाज माध्यम खात्याचे पासवर्ड्स इत्यादी माहिती त्या वितभर यंत्रात साठवलेली असते. सध्या कोरोना काळात बेकारी, गरिबी वाढल्यामुळे चोरीमारीचे प्रकारही खूपच वाढलेत. तरुण मंडळींचे स्मार्टफोन्स महागडे असतात आणि चोरायलाही सोपे असतात. हल्लीच वर्तमानपत्रात बातमी आलीय की, गणेशोत्सव काळात म्हणजे ७ ते १६ सप्टेंबर या दहा दिवसांत मुंबईत तब्बल १०८ मोबाईल चोरीला गेल्याची माहिती लोहमार्ग पोलिसानी दिली.

ग्राहकांनी मोबाईल हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर…

१) प्रथम नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करून तक्रार करा. यामुळे नवीन सीमकार्ड खरेदी करताना आधीचे सीमकार्ड हरवल्याचा पुरावा देता येतो, तसेच आपल्या मोबाईलचा गैरवापर झाल्यास त्यातून उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणीतून सुटका होऊ शकते.

२) तुमचे बँक किंवा वॉलेट अॅप सुरक्षित करा, म्हणजेच ताबडतोब तुमच्या बँक किंवा वॉलेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून त्यातील व्यवहार रोखण्यास सूचना द्या. त्यामुळे पैसे लुबाडण्यापासून बचाव होईल. टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपनीला त्या मोबाईलमधले सीमकार्ड रद्द करण्याची सूचना करा. त्यामुळे बँक व्यवहारासाठीचे OTP, जे SMSने पाठवले जातात ते मोबाईलवर जातच नाहीत.

३) तुमच्या समाजमाध्यम खात्याचे तसेच गुगल किंवा अन्य ई-मेलचे पासवर्ड बदला. इथे बऱ्याच ॲप्समध्ये तुमची खासगी माहिती साठवलेली असते. मित्रमंडळींचे तपशील असतात. या गोष्टींचा गैरवापर करून तुमच्या खासगी गोष्टी व्हायरल करणे किंवा मित्रमंडळींना खोटे संदेश पाठवून पैसे उकळणे, असेही गैरप्रकार घडू शकतात.

४) तुमचा मोबाईल लॉक करण्याचा प्रयत्न करा. स्मार्टफोन आपल्याकडे असताना नेहमी पॅटर्न, फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन (चेहरा ओळख) लॉक सुरू ठेवा, पण समजा तुम्ही तो सुरू ठेवला नसेल, तर मोबाईल हरवल्यावर तुम्ही लॉक करू शकता. आयफोन असेल तर फाईंड माय आयफोन या पर्यायाचा वापर करून लोकेशन शोधू शकता. अँड्रॉइड फोन असेल, तर दुसऱ्या
कुणाच्या फोनवरून लोकेशन शोधू शकता, तसेच पूर्ण डेटा नष्ट करू शकता.

५) गेल्या सप्टेंबर महिन्यात तत्कालीन दूरसंचारमंत्री रवी शंकरप्रसाद यांनी हरवलेल्या मोबाईल फोनची तक्रार करण्यासाठी केवळ महाराष्ट्रापुरते प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेल्या पोर्टलचे उद्घाटन केले. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण भारतभर काम सुरू करता येईल. प्रत्येक मोबाईल फोनला एक पंधरा आकडी नंबर दिलेला असतो. त्याला इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेन्ट आयडेंटिटी नंबर किंवा IMEI म्हणतात. जेव्हा मोबाईलवरून फोन केला जातो त्यावेळेस कॉल रेकॉर्डमध्ये हाच नंबर दाखवला जातो. जेव्हा फोन हरवतो किंवा चोरला जातो, तेव्हा ग्राहकांनी डिपार्टमेंट ऑफ टेक्निलॉजीच्या (DoT) १४४२२ या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवावी. (DoT) हा फोन ब्लॉक करेल. जेव्हा कधी हा वापरायला सुरुवात केली जाईल, तेव्हा लोकेशन लगेच लक्षात येऊन वापरकर्ता सापडेल. BSNL, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन या टेलिकॉम सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांनी या बाबतीत संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

ही सगळी माहिती मी शेजारणीला दिलीच. पण मंडळी, त्याचा उपयोग झाला बरं का! तुम्ही २४ सप्टेंबरच्या वर्तमानपत्रात ‘सायबर पोलिसांना ३०० मोबाईल शोधण्यात यश’ ही बातमी वाचली असेलच. उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक अगदी दुबईतूनही चोरीच्या आणि हरवलेल्या मोबाईल्सचा शोध लागला आहे. माझ्या शेजारीणबाईलाही पोलीस ठाण्यातून मोबाईल परत मिळाल्याचा फोन आला. सर्व तक्रारकर्त्यानी आपापले फोन परत मिळण्याची आशाच सोडली होती. पण म्हणतात ना केल्याने होत आहे रे!

एक सजग ग्राहक म्हणून आपली तक्रार योग्य वेळी योग्य ठिकाणी करण्याचे कर्तव्य निभावले आणि पाठपुरावा केला, तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. हरवलेले मोबाईलही परतून येतात.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -