Farmer sucide: कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या कधी थांबणार?

Share
  • फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आजपर्यंत आपण सातत्याने पाहत आलो की आपला बळीराजा शेतकरी सतत कर्जात डुबलेला असल्यामुळे, शासनाचे कोणतेही निश्चित ध्येयधोरण, उपाययोजना नसल्याने मृत्यूला कवटाळत आहे. जी काही ध्येय-धोरणं, तजवीज या आत्महत्या थांबविण्यासाठी केली जात असतात ती वेळेत आणि अपेक्षित प्रमाणात न मिळाल्यामुळे नैराश्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, गहाण पडलेल्या शेत जमिनी, सावकारांचा तगादा, कोठूनही घेतलेल्या कर्जाचे थकलेले हप्ते यामुळे हतबल होऊन अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत आपण आपल्या कृषी प्रधान देशात शेतकरी आत्महत्या थांवण्यात पूर्णपणे यशस्वी झालेलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे. त्यातूनच आजमितीला सुशिक्षित चांगल्या कुटुंबातील, शिकले सवरलेले लोकं देखील केवळ डोईजड झालेल्या कर्जामुळे, खासगी सावकारांकडून भरमसाट व्याजाने पैसे घेऊन ते वेळेत न फेडू शकल्यामुळे, उधार उसणवारीचे प्रमाण फेडण्याच्या पलीकडे गेल्यामुळे आत्महत्या करत आहेत. वाढत्या आत्महत्यामागील बहुतांश कारणं जर पाहिलीत तर त्यात आर्थिक ओढाताण, कर्ज, उद्योग धंद्यात आलेले अपयश, आर्थिक नुकसान, तोटा, कर्ज वसुलीसाठी वापरली गेलेली अमानुष अपमानास्पद वागणूक, अर्वाच्य भाषा, शिवीगाळ यांसारखी कारणं मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

आपल्याला असलेली नियमित आर्थिक आवक, उत्पन्नाचे साधन, होणारा खर्च तसेच आपली आर्थिक परिस्थिती आणि कोणत्याही अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण केलेली बचत अथवा तजवीज याचा ताळमेळ सगळ्यांनाच जमतोय असं नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, पैसा मिळवण्यासाठी वापरले जाणारे शॉर्टकट, लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी केलेले उलटे-पालटे व्यवहार यासारख्या सवयी आपल्या जीवावर उठत आहेत.

अनेक सर्वसामान्य कुटुंब नवीन घर, घराचं नूतनीकरण, नवी गाडी, छोट्या मोठ्या घरगुती वस्तू, फर्निचर, मुलांचं शिक्षण, लग्न यासाठी कर्ज घेतात. आपण प्रगती करावी, लवकरात लवकर सेटल व्हावे, आपल्या हक्काचं स्वमालकीचं सर्व काही आपल्याकडे असावं, आपल्याला उच्च राहणीमान उपभोगता यावं, समाजात आपल्याला पण मिरवता यावं या अपेक्षा ही स्वप्न पाहत असताना त्यासाठी भरपूर प्रयत्न, प्रामाणिक कष्ट सर्वसामान्य माणूस सातत्याने करत असतो. हे करणं गैर नाही, आपण महत्त्वाकांक्षी नक्कीच असावं पण त्यासाठी चुकीचे निर्णय, चुकीच्या लोकांकडून घेतलेली आर्थिक मदत आपल्या अंगलट येऊ शकते, याचेही भान जपणे आवश्यक आहे. आज-काल पती-पत्नी दोघेही कमावते असल्यामुळे कर्जाचे हफ्ते देखील व्यवस्थित फेडले जातात, अतिशय तरुण वयात स्वतःच सुसज्ज घर, गाडी घेऊन झपाट्याने ते भविष्याचे नियोजन करायला लागतात. पण काहींच्या बाबतीत हे शक्य होत नाही आणि आयुष्याची घडी विस्कटून जाते.

सगळ्यांनाच सर्व काही जमेल, सगळेच आर्थिक गणित आपल्या नियोजनानुसार जुळेल याबद्दल काहीच शाश्वती नसते. आपल्याला नोकरी अथवा व्यवसायामार्फत निश्चित स्वरूपात पगार अथवा इनकम असेल तर आपण कोणत्याही अधिकृत, कायदेशीर मार्गाने कर्ज घेऊ शकतो, ते परत फेडू शकतो. जर कोणत्याही अधिकृत ठिकाणांवरून कर्ज नाकारलं गेलं, आपण त्याच्या नियमात बसत नसलो, तर आपण खासगी सावकार, व्याजाने पैसे घेणे, सोनं तारण ठेवणे, अथवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू तारण ठेवून वाटेल त्या व्याज दराने पैसे उचलतो. भविष्यात काहीतरी तजवीज होईल, उत्पन्न मिळेल, कोणी नातेवाईक, मित्र मदत करेल या भाबड्या आशेवर आपण मोठी जोखीम स्वीकारतो. अशा अनधिकृत पद्धतीने घेतलेले पैसे व्याजाचे मीटर सुरू झाल्यावर प्रचंड त्रासदायक ठरतात. उसने अथवा व्याजाने पैसे घेऊन त्याचे व्याज वेळेत न भरल्यास लावला जाणारा तगादा आपली मानसिकता उद्विग्न करून टाकतो. व्याज अथवा मुद्दल वसूल करण्यासाठी वापरली जाणारी भाषा, दिल्या जाणाऱ्या धमक्या, मानसिक खच्चीकरण, बदनामीची भीती, घरातील बाई माणसाची पणाला लागलेली अब्रू कोणत्याही सर्वसामान्य घरातील, कुटुंबातील माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे असते. अशा प्रकरणात केले जाणारे ब्लॅकमेल, सतत येणारे फोन, मेसेज, सातत्याने दारात येणारी माणसं, कर्जबाजारी पणामुळे समाजात होणारी मानहानी यामुळे सर्वसामान्य माणूस खचून जातो. एकाचं देणं मिटवायला दुसऱ्याकडून पैसे घेणं, परत त्याचं व्याज देणं, परत तो घेणेकरी डोक्यावर बसल्यावर तिसऱ्याकडून पैसे घेणं या चक्रामधून सहजासहजी बाहेर पडता येत नाही.

खासगी सावकार, अनधिकृत ठिकाणावरून भरमसाट व्याजदराने पैसे घेणे कोणत्याही सरळमार्गी, सर्वसामान्य नौकरदार अथवा मध्यमवर्गीय माणसाच्या हिताचे नाही. वास्तविक अशा बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेऊन आपला जीव पणाला लावणे ही चूक कोणीच करता कामा नये. आपण कितीही सधन असलात, श्रीमंत असलात, पैसेवाले असलात तरीही अशा चुकीच्या लोकांना मोठं करण्यासाठी, त्यांची गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागण्यासाठी, त्यांचं धाडस वाढण्यासाठी आपण कारणीभूत होणं योग्य नाही. चुकीच्या पद्धतीने पैसे व्याजाने देऊन त्याच्या कितीतरी पटीने ते वसूल करणारे, धाक, बळजबरी, दबाव या तंत्राचा वापर करून समाजात वावरणारे गुन्हेगार तोपर्यंत थांबणार नाहीत, जोपर्यंत आपण सर्व जण ही जीवघेणी सावकारकीची पद्धत बंद पाडणार नाही.

आपल्याला अशा पद्धतीने पैसे घ्यायला लागू नयेत आणि आत्महत्या करण्यापर्यंत आपल्यावर वेळ येऊ नये यासाठी आपण आपली आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ओळखून असणे महत्त्वाचे आहे. आपल्या गरजा अत्यंत कमी ठेवणे, काटकसर करून राहणे, खोटा मोठेपणा, दिखाऊपणा याच्या आहारी जावून आपल्या कुवतीच्या बाहेर जावून कोणतेही आर्थिक व्यवहार न करणे, शक्यतो उधारी, कर्ज, उसणे पैसे घेणे यासारख्या त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणे, स्वतःला तसेच कुटुंबाला आर्थिक शिस्त लावणे, योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊनच कोणताही आर्थिक व्यवहार करणे, जे आहे, जशी परिस्थिती आहे त्यात तडजोड करण्याची सवय अंगीकरणे, घरातल्या लोकांना खोटी चुकीची मोठी स्वप्नं न दाखवणे, कोणतीही आर्थिक देणेदारी प्रामाणिकपणे वेळच्या वेळी परत करणे, उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचारपूर्वक ताळमेळ घालणे, ज्या कामाचे पैसे त्याच कामाला वापरणे, इतरत्र ते खर्च होणार नाहीत याची काळजी घेणे, आपल्या आर्थिक परिस्थितीची लाज न बाळगता जसं आहे तसं वास्तवात जगणे, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची इतरांशी तुलना करून त्यात कमीपणा न मानणे, दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याच्या पैशांवर, घेतलेल्या पैशांवर स्वप्न रंगवून कोणाचा राग, रोष ओढून न घेणे, कोणतेही आर्थिक व्यवहार कायदेशीर, कागदोपत्री अधिकृत व्यक्तींना मध्यस्थी घेऊन करणे, आर्थिक अडचणींना खंबीरपणे सामोरं जाणे, कोणतीही पळवाट न शोधणे यांसारखी पथ्य पाळली, तर निश्चितच आपण सुखी-समाधानी आयुष्य जगू शकू.

Recent Posts

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

14 mins ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

28 mins ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

2 hours ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

3 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

4 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

5 hours ago