Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीDrugs Cases : अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सरकारने काय केलं?

Drugs Cases : अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सरकारने काय केलं?

विरोधकांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं चोख उत्तर

नागपूर : नागपूर (Nagpur) येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन चर्चा सुरु आहेत. विरोधक सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत तर सत्ताधारीदेखील विरोधकांना पुरुन उरत आहेत. यातीलच काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे राज्यात सुरु असलेली अमली पदार्थांची तस्करी (Drug trafficking). ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) पुण्यातील रुग्णालयातून पसार झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली होती. आज विधानसभेत विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारने केलेल्या उपाययोजना सांगत चोख प्रत्युत्तर दिले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृह विभागाने अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची (Anti narcotics task force) निर्मिती केली आहे. याद्वारे आपण राज्यात ५०,००० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले आहेत. वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बंद कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सपासून ड्रग्स बनवले जात असल्याची माहिती मिळाल्यावर तिथेही धाडी टाकण्यात आल्या, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी ललित पाटीलच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ललित पाटील एक गुन्हेगार आहे. त्याची विश्वासार्हता काय? तसेच त्याला ज्यांनी मदत केली अशा चार पोलिसांना कलम ३११ अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित थेट सहभाग असलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १० पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तसेच आता पोलीस केवळ अमली पदार्थ खरेदी करणारे आणि विकणारेच नव्हे तर विक्रेत्यांची साखळी शोधून संपूर्ण रॅकेटवर कारवाई करत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्यासाठी विशेष कायदा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले.

कशी होते अमली पदार्थांची तस्करी?

राज्यातील अमली पदार्थांच्या तस्करीबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, समाजमाध्यमांद्वारे जसे की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी केली जात आहे. तसेच गुगल पेसारख्या यूपीआय पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे देणं आणि कुरीअर एजन्सींच्या माध्यमातून अमली पदार्थांची डिलीव्हरी करणं असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही कुरीअर एजन्सींना एक नियमावली पाठवली आहे. तसेच त्यांच्याकडे असं कुठलंही पॅकेज सापडलं तर सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कुरीअर एजन्सींना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पॅकेजची पडताळणी करून पाहावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -