Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य; २१ ते २७ एप्रिल २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, २१ ते २७ एप्रिल २०२४

क्लिष्ट समस्या सोडवू शकाल

मेष : हा आठवडा आपल्याला अनुकूल स्वरूपाचा जाईल. आपल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धी करणारा ठरेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हातात घ्याल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन योजना तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. त्याचा व्यवसायावर पोषक परिणाम होईल. भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद टाळा. समज- गैरसमज नको. व्यवसायाचे हित लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही क्लिष्ट समस्या आपण सोडवू शकाल. वरिष्ठांच्या बरोबर असलेले संबंध सुधारतील. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत.

जीवनमान बदलू शकते

वृषभ : या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे. इतरत्र वेळ वाया न घालवता कार्यमग्न राहणे महत्त्वाचे ठरेल. आलेल्या नवीन संधीमुळे आपले रोजचे जीवन बदलू शकते. प्रगती, उन्नती करू शकाल. आर्थिक बाजू भक्कम राहिल्याने आपल्या मनातील नियोजन आपण प्रत्यक्षात आणू शकाल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. नवीन करारमदार करू शकाल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून योग्य कालावधी आहे. नवीन संकल्पनांचा वापर फायदेशीर ठरेल. भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत व्यावहारिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते. नोकरीमधील वातावरण सर्वसामान्य राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील.

मदत मिळेल

मिथुन : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्धी ठरतील. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक उद्भवलेल्या समस्या शांतपणे व प्रयत्नाद्वारे सोडवू शकाल. इतरांची मदत मिळेल. मात्र इतरांशी सौजन्याने व विनयशीलतेने वागण्याची गरज आहे. व्यवसाय-धंद्यात काही वेळेस आर्थिक गरज निर्माण होऊ शकते तसेच कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहा. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे. विरोधकांचा विरोध प्रबळ होण्याची शक्यता आहे. तसेच शत्रू व हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहा.

आशीर्वाद लाभतील

कर्क : दीर्घकाळ रखडलेले अथवा प्रलंबित राहिलेले जमिनीचे तसेच स्थायी मालमत्तेचे व्यवहार गतिशील होऊन त्याचा पूर्णत्वाकडे प्रवास होईल. समाजातील काही मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल. मित्रमंडळींच्या परिवारातून मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. मात्र प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मन शांत ठेवून दृढ निश्चयाने लहान-मोठे निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. परिवारातून मदत मिळेल.

अपेक्षित सहकार्य मिळत राहील

सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही अनपेक्षितरीत्या संधी मिळू शकतात. कामात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उपयोगी कालावधी. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यश मिळेल. कुटुंब परिवार तसेच आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे आपल्या समोरील कामे सहज होतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवास सुखकर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धीचे योग आहेत.

सतर्क राहणे आवश्यक

कन्या : सध्याचा कालावधी अनुकूल असला तरी काही बाबतीत आपल्याला सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. उलाढाल वाढेल; परंतु जबाबदाऱ्या व खर्चही त्याच प्रमाणात वाढल्याने गोंधळून जाण्याची शक्यता. व्यवसायिक समस्या शांतपणे विचार करून मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात भागीदारामुळे प्रश्न संपुष्टात येतील. आर्थिक मदत मिळू शकते. येणाऱ्या कालावधीमध्ये यशाचे प्रमाण वाढणार आहे.

नाट्यमय प्रसंग घडू शकतात

तूळ : भाग्याची साथ मिळाल्यामुळे रखडलेली किंवा अर्धवट अवस्थेतील असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय-धंद्यात अपुरे राहिलेले प्रोजेक्ट आता पूर्ण होतील. पण प्रयत्न मात्र त्यादृष्टीने केल्यास त्यात यश मिळेल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास आपली कामे आपण पूर्ण करू शकाल. वेळेचा अपव्यय व आळस टाळणे हितकारक ठरेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. दूरचा प्रवास घडू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपेक्षित कामे मार्गी लावू शकाल.

नवे नियोजन कराल                                                        

वृश्चिक : आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्याने पुढील कामे करण्यात उत्साह राहील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हाती घ्यावीशी वाटेल. तसेच त्या दृष्टिकोनातून नवे नियोजनही कराल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून काही नवीन बदल करण्याचे ठरवाल. हे नवीन प्रकारचे बदल आपल्या व्यवसायासाठी पोषक ठरतील. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार कराल. आत्मविश्वासाने जरी निर्णय घेतले तरी वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक ठरेल.

भावनांवर नियंत्रण आवश्यक

धनु : आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठराल. एखादी महत्त्वाची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. भावनांवर नियंत्रण राहील.आर्थिक परिस्थिती उंचावेल. जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. रोजगारांना रोजगार मिळू शकतो.

खर्चात वाढ होऊ शकते

मकर : सदरील काळामध्ये कधी चांगले तर कधी गोड अनुभव येतील. दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल; परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये समस्या तसेच विलंब होऊ शकतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. आपला राग कुटुंबीयांवर काढू नका. स्वतः आपल्या कार्यामध्ये प्रयत्नशील व कार्यरत राहिल्यास यश आपलेच आहे हे लक्षात ठेवा. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. आजचे काम उद्यावर ढकलणे महागात जाण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते. काही खर्च अचानक करावे लागतील. घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन चकीत करू शकते. कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम करण्याचे नियोजन होईल.

कार्ये मार्गी लागतील

कुंभ : काहीसे प्रतिकुल ग्रहमान असले तरी आतापर्यंत जी कामे अडकली होती अथवा ज्या कार्यांमध्ये अडथळे येत होते असे अडथळे दूर होऊन कामे मार्गी लागतील. तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. काहींचे ओळखीतून विवाह ठरतील. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. विवाह ठरताना जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. त्याचप्रमाणे अर्धवट राहिलेले अथवा दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले जमीन, स्थायी मालमत्ता इत्यादीविषयक व्यवहार गतिमान होतील. कामात यश लाभेल. त्यामुळे समाधान मिळेल. काही वेळेस शारीरिक तसाच मानसिक ताण-तणाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील.

कार्यपूर्ततेचा आनंद मिळेल                                                                  

मीन :  आपल्या आजूबाजूस अनुकूलतेचे प्रमाण वाढलेले आपल्याला अनुभवता येईल. थोड्याच प्रयत्नांनी दैनंदिन कामे होत असलेली बघून आपला आत्मविश्वास बळावेल. नवीन कामे हाती घ्याल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नवीन नियोजन करू शकाल. एखादे महत्त्वाचे काम बरेच दिवस होण्याची वाट आपण बघत होता ते काम झाल्यामुळे इच्छापूर्तीचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रयत्नांना यश मिळून अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. काही बाबतीत मात्र अधिक मेहनतीने यश खेचून आणावे लागेल. प्रयत्नात कमी पडून देऊ नका. कुटुंबातून जीवनसाथीची साथ आपल्याला मिळेल. नोकरीमध्ये सोपविलेल्या कामामध्ये यश मिळेल.

Recent Posts

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

25 mins ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

1 hour ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

2 hours ago

Blast: फटाका कंपनीत भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू ३ जखमी

शिवकाशी: तामिळनाडूच्या शिवकाशीमद्ये गुरूवारी एका फटाका कंपनीत(fireworks factory) भीषण स्फोट झाला. यात पाच महिलांसह ८…

3 hours ago

Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा!

हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यात यलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई…

4 hours ago