Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणगाळ काढण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊ

गाळ काढण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील चिपळूण व महाड ही दोन्ही शहरे पूरग्रस्त आहेत व येत्या पावसाळ्यात पुन्हा महापुराची टांगती तलवार आहे. यातून केंद्र सरकारने गाळ काढण्याच्या उपाययोजनांवर मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केले आहे. त्यावर नारायण राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेऊन प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नारायण राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, वाशिष्ठी व काजळी नदीला दरवर्षी पूर येतो. या पुरामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यावर्षी जो महापूर आला त्यामध्ये महाड व चिपळूण ही दोन्ही शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. या दोन्ही नद्यांतील गाळ लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारचे मंत्री व प्रशासन यंत्रणा फक्त हवेत आश्वासने देत आहेत व कोणतीही कार्यवाही अद्यापही केलेली नाही.

त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत अत्यंत कमी कालावधी राहिला आहे. जर आताच हा गाळ काढला गेला नाही तर पुन्हा एकदा महापुराचा धोका संभवतो. यासाठी केंद्र सरकारने कोकणातील या दोन्ही शहरांना दिलासा द्यावा व त्या दोन्ही नद्यांतील गाळ काढण्याबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन जठार यांनी केले आहे. प्रमोद जठार यांच्या विनंतीची दखल घेऊन लवकरात लवकर या संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. ही बैठक पुढील काही दिवसांमध्ये आयोजित केली जाईल, असे जठार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -